पंकज पाटील / अंबरनाथनिधीची चणचण असतानादेखील शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्याचे कारण पुढे करून ज्या बी केबिन रोडचे काम पालिकेने सुरू केले आहे, त्या रस्त्याचे काम आता वादात सापडले आहे. विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता होणे गरजेचे असताना अधिकाऱ्यांनी परस्पर हा रस्ता वळवला आहे. एवढेच नव्हे तर ज्या पद्धतीने हा रस्ता वळवला आहे, त्यामुळे या रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्र तयार होणार आहे. या बाबीची कल्पना असतानादेखील नगररचना विभागाने चुकीच्या पद्धतीने मार्किंग दिल्याचे समोर आले आहे. रस्ता फिरवल्याने त्याचा थेट फायदा हा रस्त्याला लागून असलेल्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला होणार आहे. अंबरनाथमधीलबी केबिन रोड हा काँक्रिट करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी पालिकेच्या सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या महत्त्वाच्या रस्त्यावरील जो भाग काँक्रिटचा झाला नव्हता, तो भाग काँक्रिट करण्यासाठी ८ कोटी ५० लाखांची तरतूद पालिकेने केली होती. पालिकेची आर्थिक क्षमता नसतानादेखील राजकीय हट्टापायी या रस्त्याचा विषय मंजूर करून घेण्यात आला. हा रस्ता नागरिकांऐवजी येथील एका बड्या बिल्डरच्या संकुलापर्यंत जाण्यासाठी करत असल्याचा आरोपदेखील केला होता. हा आरोप खोटा ठरवत पालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम मंजूर केले होते. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर पुन्हा एकदा या रस्त्याचे काम बिल्डरसाठीच केले जात असल्याचे समोर आले आहे. बी केबिन रोडचे काम करताना स्टेशनच्या बाजूने रस्त्याचे काम न करता संबंधित बिल्डरच्या संकुलापासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता रेल्वे रुळांना समांतर असल्याने या रस्त्यावर कोठेही वळण नाही. तसेच रेल्वेची हद्द निश्चित असल्याने त्या हद्दीपासून १८ मीटरच्या रस्त्याचे मार्किंग घेऊन त्याच्या मध्यभागी काँक्रिट रस्त्याचे काम करणे गरजेचे होते. मात्र, हा रस्ता रेल्वे रुळांच्या बाजूला सरकवत एका बिल्डरसाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा घाट पालिकेने घातला आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी पालिकेचे काही अधिकारी पुढे सरसावत आहे. या रस्त्यावरील सर्वात मोठी चूक रस्ता वळवताना झाली आहे. आधी झालेला काँक्रिट रस्ता एका ठिकाणी थेट एल आकारात वळवला आहे. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्याची लेन एकाच रस्त्यावर आली आहे. हा प्रकार घडल्याने थेट समोरासमोर वाहनांची धडक होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी तांत्रिक चूक झालेली असतानादेखील पालिकेचे अधिकारी मात्र रस्ता नियमानुसारच होत असल्याचा दावा करत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करताना रस्त्याचा मध्यबिंदू काढून त्याच्या दोन्ही बाजूंना काँक्रिटीकरण करणे गरजेचे होते. उर्वरित जागेवर पेव्हरब्लॉक बसवले जाणार होते. मात्र, या ठिकाणी रस्ता वळवत अनेक मोठे वृक्ष तोडण्याचे काम पालिकेने आणि ठेकेदाराने केले आहे. हा रस्ता वळवला नसता तर आहे त्या जागेवरून काँक्रिटीकरण करत अनेक वृक्ष वाचवणे शक्य झाले असते. मात्र, पालिकेने रस्ता वळवत काँक्रिट रस्त्याला लागूनच पाम ट्री ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडणार आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रितक चुका झाल्याचे स्पष्ट दिसत आहे आहे.एवढेच नव्हे तर पुन्हा याच रस्त्यावर नवरेनगरकडे वळणाऱ्या मार्गावरदेखील एल आकारात रस्ता वळवण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी अपघातांचे केंद्र उभारत बिल्डरला झुकते माप दिले जात आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका रोहिणी भोईर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली आहे.
मुख्य रस्त्याला दिली बगल
By admin | Updated: December 24, 2016 03:06 IST