भिवंडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवू असा निर्धार शिवसेनेचे ठाणे जिल्हा (ग्रामीण) संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी शनिवारी व्यक्त केला. दापोडा येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस कृष्णकांत कोेंडलेकर, आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, तालुकाप्रमुख विश्वास थळे ,मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष देवाराज म्हात्रे ,श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर उपस्थित होते. म्हात्रे यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व इतर पक्षाची महायुती झाली आहे. तळागाळातील शिवसैनिक बाजार समितीवर भगवा फडकावून भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आता सत्तारूढ भाजपा विरु द्ध शिवसेना प्रणित ्रसर्वपक्षीय महाआघाडी अशी थेट लढत होणार आहे. १७ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, बुधवारी शेवटची प्रचारसभा सोनाळे येथील क्रीडांगणावर गेली झाली. यावेळीही उपस्थित नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आपला विजय निश्चित असला तरीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही असेही या नेत्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. एकूणच ही निवडणूक रंगतदार होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभांना नागिरक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
भाजपाला त्यांची जागा दाखवून देऊ
By admin | Updated: February 10, 2017 04:00 IST