ठाणे : जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने अनेक माकडे शहराकडे वाटचाल करू लागली आहेत. अशीच काही माकडे आपल्या पिलांना घेऊन येथील हनुमाननगर परिसरात अन्नाच्या शोधात आली होती. त्यातील दोन पिलांचा विजेच्या पोलवरील हायटेन्शन वायरचा धक्का लागून करुण अंत झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे माकड हा वन्य प्राणी असल्याने त्याची जबाबदारी वन विभागाने स्वीकारणे अपेक्षित असताना त्यांनी हात वर केल्याने अखेर माकडांचा कोणताही पंचनामा न करताच अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. शनिवारी सकाळी माकडांची टोळी या भागात अन्नाच्या शोधात आली होती. त्यापैकीच एका टोळीतील २ लहान माकडे खेळत असताना पोलवरील हायटेन्शन वायरचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. वागळे इस्टेटमधील हनुमाननगर डोंगरातच वसलेले आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात अनेक माकडे या परिसरात नेहमी येतात. त्यांना येथील रहिवासी खाद्यदेखील पुरवतात. दरम्यान, यापूर्वीदेखील या परिसरात विजेचा शॉक लागून एका माकडाचा करुण अंत झाला होता. परंतु, वारंवार घडणाऱ्या या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. माकडांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणचा पंचनामा करण्याची जबाबदारीही वन विभागाने टाळल्याचा आरोप ठाणे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे कौस्तुभ दरवसे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
दोन माकडांचा शॉक लागून मृत्यू
By admin | Updated: July 24, 2016 03:35 IST