भार्इंदर : शिवसेनेतील बंडखोरीचा तिढा सुटल्याने बुधवारी (१६ डिसेंबर) पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे हरिश्चंद्र आमगावकर यांना १६ पैकी ९ मते मिळाल्याने ते बहुमताने निवडून आले आहेत. काँग्रेसच्या मर्लिन डिसा यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे बंडखोर ठरलेले प्रभाकर म्हात्रे यांचे अनुमोदक राष्ट्रवादीचे रवींद्र माळी अनुपस्थित राहिले.शिवसेना-भाजपा युतीतील तहानुसार यंदाचे स्थायी सभापतीपद शिवसेनेला देण्यात आले होते. त्यानुसार, सेनेने आमगावकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील प्रभाकर म्हात्रे यांनी आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या उद्देशाने बंडखोरी केली होती. त्यांच्या बंडखोरीमुळे मातोश्रीच्या आदेशावरून निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आमगावकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तत्पूर्वी तेच सभापतीपदी विराजमान व्हावेत, यासाठी अपक्षासह बविआ, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही सदस्यांत घोडेबाजार झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या घोडेबाजारात न्हाऊन निघालेल्यांपैकी काहींनी निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वीच आपला संपर्क बंद ठेवला होता. दरम्यान, आमगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी युवासेनेचे सरचिटणीस पूर्वेश सरनाईक, शहरप्रमुख धनेश पाटील, उपशहरप्रमुख शंकर वीरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्थायी सभापतीपदी शिवसेनेचे आमगावकर
By admin | Updated: December 17, 2015 01:52 IST