ठाणे : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम करून आपली यादी महासभेत पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर केली. परंतु, स्थायी समितीत कोणाला पाठवायचे, यावरून शिवसेनेत एकमत न झाल्याने अखेर उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाणीचे कारण पुढे करून सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण महासभाच पूर्णवेळ तहकूब केली आहे.माळवी यांना मारहाण झाल्याचा मुद्दावर तासभर चर्चा झाली. त्याच वेळेस महासभा पुन्हा सुरू करण्यासाठी विरोधकांनी हालचालीदेखील सुरू केल्या. प्रशासनानेदेखील काही महत्त्वाचे विषय घेऊन महासभा तहकूब करावी, अशी विनंती महासभेकडे केली. त्यानुसार, महत्त्वाचे विषय घेण्यासाठी महापौरांनी सुरुवात करताच शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले त्यांच्याकडे गेले आणि कानात काहीतरी कुजबुजले. त्याच वेळेस राष्ट्रवादीने स्थायी समितीसाठीची प्रमिला केणी आणि सुहास देसाई आणि काँग्रेसने यासीन कुरेशी यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्यानुसार, स्थायीचा मुद्दाही मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. परंतु, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेची यादीच पीठासीन अधिकाऱ्यांकडे न आल्याने अखेर स्थायी समिती सदस्य निवडीचा विषयही प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)नेत्यांमध्ये एकमत नसल्याने विषय प्रलंबितच शिवसेनेची नेतेमंडळी नाट्यसंमेलनात व्यस्त असल्याने स्थायी समितीमध्ये कोणाला पाठवायचे, यावर एकमत झाले नाही. यापूर्वी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी अनेकांना स्थायीमध्ये पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आपली वर्णी लागावी म्हणून अनेकजण तयार आहेत. ज्या सदस्यांनी यापूर्वीदेखील स्थायीत काम केले आहे त्यांनी पुन्हा इच्छुकांमध्ये भाऊगर्दी केल्याने कोणाला स्थायी समितीत पाठवायचे, यावर नेतेमंडळींमध्येच एकमत न झाल्याने अखेर हा विषय प्रलंबित ठेवल्याचे बोलले जात आहे.
स्थायीसाठी शिवसेनेची यादी ठरेना
By admin | Updated: February 21, 2016 01:54 IST