अंबरनाथ : येथील शिवसेना आणि मनसेच्या आजी-माजी नगसेवकांमध्ये खुल्या नाट्यगृहाच्या श्रेयावरून चांगलीच जुंपली आहे. मनसे नगरसेवकांच्या कार्यकाळात बांधलेल्या पूर्वेतील बाबासाहेब पुरंदरे नाट्यगृहाच्या भिंतीवर विद्यमान नगरसेवकाने आपले नाव लावल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या आजी-माजी नगरसेवकांनी फलकाला काळे फासले. दोन वर्षांपूर्वी मनसेचे नगरसेवक स्वप्नील बागुल आणि दत्ता केंगरे या दोन नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात अंबरनाथ पूर्वेच्या वडवली परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खुले नाट्यगृह पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले होते. आता या परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी या नाट्यगृहाच्या भिंतीवर काही संबंध नसताना आपले नाव लिहिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या नगरसेविका सुप्रिया देसाई, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के , बागुल आणि केंगरे यांनी साळुंखे यांच्या नावाच्या फलकाला काळे फासले. पुरंदरे नाट्यगृहाच्या भिंतीवर परस्पर प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी रंगवून त्याखाली आपले नावही लावले आहे. कोणतीही परवानगी न घेता हे अनधिकृतपणे करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. त्यांनी स्वत: केलेल्या कामाला खुशाल आपले नाव द्यावे. मात्र, मनसेच्या नगसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करू नये, असा इशारा शिर्के यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना नगरसेवकाच्या फलकाला काळे
By admin | Updated: January 26, 2017 03:05 IST