कल्याण : घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला आहे. आता पाणीप्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणीप्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्याविरोधातही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.
महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. याप्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करून आयुक्तांच्या विरोधातही टीकेची झोड उठविली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा असे त्यावर लिहिले होते. चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टीका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. यादरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी याही होती. रविना माळी यांच्या लेटरहेडवर त्यांनी निवेदन दिले आहे. २७ गावांत अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्यांना खासदार शिंदे जबाबदार आहेत. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील, असे म्हटले आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई केली जावी.
दरम्यान, शिवसेनेचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा कार्यादेश मिळालेला नसताना भाजपने भूमिपूजन कसे काय केले. आमच्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे भूमिपूजन करणे हा आमचा हक्कच आहे. रविना माळी यांचा नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरीदेखील त्यांचे लेटरहेड वापरून त्याच गैरवापर करीत आमच्या खासदारांना नाहक बदनाम केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
----------------