उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शिंदेसेना व ओमी कलानी टीम यांची युती झाल्याची घोषणा दोन्हीकडील नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. या युतीने भाजपाला धक्का बसला असून ओमी टीम स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे उघड झाले.
उल्हासनगरातील मराठी पट्ट्यात शिवसेनेची ताकद असून गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक निवडून आले होते. तर पाच उमेदवारी अगदी कमी मताने पराभूत झाले. दोन नगरसेवक सोडल्यास इतर माजी नगरसेवक शिंदेसेने सोबत आहेत. तर सिंधी पट्ट्यात कलानी यांचे वर्चस्व असून त्यांचे एकूण २१ समर्थक नगरसेवक निवडून आले. अशी माहिती मनोज लासी यांनी दिली. गेल्या निवडणुकीत ओमी टीम व भाजपाने एकत्रित निवडणूक लढवून यांचे एकूण ३५ नगरसेवक निवडून आले. ओमी टीमच्या २१ पैकी ५ समर्थक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. प्रत्यक्षात ते कलानी करिष्मामुळे निवडून आल्याचे मनोज लासी यांचे म्हणणे आहे. ओमी टीमला गळती लागू नये म्हणून, घाईघाईने शिंदेसेना व ओमी टीम युती झाल्याचे बोलले जाते.
शिंदेसेना व ओमी टीम युतीची घोषणा शिंदेसेना व ओमी टीम युतीची घोषणा ओमी कलानी, राजेंद्र चौधरी, अरुण अशांन, रमेश चव्हाण, राजेंद्रसिंग भुल्लर, मनोज लासी, कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती आदी नेत्यांनी केली. महापालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास दोन्ही नेत्याकडून यावेळी व्यक्त केला.
शिंदेसेना व भाजप महायुतीचा भाग स्थानिक पातळीवर शिंदेसेना व ओमी टीमची युती झाली असलीतरी, भाजपा व शिंदेसेना हे महायुतीचा भाग आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम असल्याचे मत शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले.
साई पक्षाची भूमिका निर्णायक स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जिवन इदनानी यांचा काही प्रभाग क्षेत्रात ताकद असून गेल्या निवडणुकीत इदनानी यांच्या साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. दरम्यान साई पक्ष भाजप सोबत गेल्याने, भाजपाची ताकद वाढली. यावेळी साई पक्ष कोणाकडे जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपाई गट कोणासोबत? शहरांत रिपाई आठवले गट, पीआरपी, वंचित बहुजन आघाडी, रिपाई गवई गट या पक्षाचाही ताकद काही भागात आहे. हे पक्ष कोणासोबत जाणार याबाबतही चर्चा सुरू झाली.