ठाणे : शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वीच आठ जणांना महापौरपदाचे गाजर दिले असताना आता बंडोबांचे बंड थोपवण्यासाठी १३ जणांना एकाच वेळेस मागच्या दरवाजाचे स्वीकृत सदस्य करण्याची आॅफर दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपानेही अर्धा डझन बंडखोरांना अशाच प्रकारची आॅफर दिली आहे. काहींना तर थेट परिवहन सभापतीपदाची आॅफर भाजपाने दिल्याची माहिती आहे. या दोन्ही पक्षांनी परिवहन समिती सदस्य आणि वृक्ष प्राधिकरणाचीही अथवा पक्षात मोठे स्थान देऊ, अशा काहीशा धूळफेक करणाऱ्या आॅफर दिल्या आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, म्हणून अनेकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे अट्टाहास केला. परंतु, सत्तेची गणिते जुळवण्याच्या नादात शिवसेना आणि भाजपाने आयारामांवर अधिक विश्वास ठेवून प्रथम त्यांना उमेदवारी बहाल केली. त्यानंतर, आपल्या घरच्यांना, नातेवाइकांना, बायकांना, मुलांना, सुनांना तिकिटे दिल्यानंतर मग शेवटी निष्ठावान कार्यकर्त्यांचा नंबर लावण्यात आला. परंतु, यामध्येदेखील ज्यांचे वजन अथवा आर्थिक बाजू मजबूत, अशांना प्राधान्याने संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्यांनी मग थेट पक्षाच्या विरोधात बंडाळी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. बंडखोरांनी अशा प्रकारे थेट पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिल्याने अधिकाधिक सदस्यसंख्या जोडण्यात हा अडथळा ठरू शकतो, म्हणूनच मग या बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी शिवसेना आणि भाजपाला ६ फेबु्रवारीची अख्खी रात्र बैठकांमध्ये घालवावी लागली.भाजपामध्ये बंड करणाऱ्यांची संख्या ही अधिक होती. त्यातील ८० टक्के बंडखोरांचे बंड थोपवण्यात पक्षाला यश आल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, बंडोबांचे हे बंड थोपवताना एक डझनहून अनेकांना भाजपाने मागच्या दरवाजासह, परिवहन सभापतीची आॅफर दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजपानेच केलेल्या सर्व्हेनुसार त्यांच्या २० ते २५ जागा येणार आहेत. असे असताना अशा प्रकारच्या आॅफर देणे म्हणजे या बंडखोरांच्या डोळ्यांत धूळफेक केल्यासारखेच आहे, अशी चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत रंगली आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपातर्फे बंडखोरांवर आॅफर वर्षाव
By admin | Updated: February 9, 2017 03:59 IST