ठाणे : लॉजच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय चालवणाऱ्या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. वाघबीळ परिसरातील एका हॉटेलवर धाड टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली असून पाच महिलांची सुटका केली आहे.वाघबीळ परिसरातील शंभूजी लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांना या वेळी समजले. लॉजमध्ये थांबण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ही ‘सेवा’ पुरवण्यासाठी एक दलालही ठेवण्यात आला होता. पोलिसांनी या दलालासह लॉजचा व्यवस्थापक आणि एका वेटरला अटक केली. त्यांच्या तावडीतून पाच महिलांची सुटका पोलिसांनी केली. रोहित शेट्टी, धर्मेंद्र सेन आणि हितेश देडिया ही आरोपींची नावे आहेत. त्यापैकी रोहित शेट्टी हा व्यवस्थापक, तर धर्मेंद्र सेन हा वेटर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लॉजमधून २० हजार रुपये रोख, एक मोबाइल फोन, लॉजचे रजिस्टर आणि काही निरोध पोलिसांनी जप्त केले आहेत.(प्रतिनिधी) - अंधेरी येथील जयप्रकाश शेट्टीदेखील या प्रकरणात आरोपी असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय
By admin | Updated: April 14, 2017 03:25 IST