ठाणे : युती होईल ती आमच्या अजेंड्यानुसार आणि पारदर्शकतेच्या आधारावर असे मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याने ठाण्यात आता शिवसेनेनेही आपल्या पध्दतीने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. नवऱ्याबरोबर जर बायकोला नांदायचे नसेल, तर एकटा चालण्यासाठी नवरा सज्ज असल्याचा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. युती झाली तर युतीसोबत आणि स्वबळाचा निर्णय झाला तर स्वबळावर लढण्यास आम्ही सज्ज असल्याचे प्रत्युत्त्तर त्यांनी भाजपाला दिल्याने युतीच्या बिघाडीत आणखी एक ठिणगी पडली आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि शिवसेनेने युतीसाठी दिलेल्या टाळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत गुरुवारी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला संदेश दिला. युतीबाबत भाष्य करतांना मुख्यमंत्र्यांनी युती ही पारदर्शक आणि आमच्या अजेंड्यानुसार होईल असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे नेते मुंबई महानगर पालिकेतील कारभारावर सातत्याने टीका आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. ते पाहता तेथील भ्रष्टाचाराला कोणाचे पाठबळ आहे, हे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यानी पारदर्शकता या शब्दाचा वापर जाणीवपूर्वक केला तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीच्या इतिहासाची आठवणही करुन दिली जाते. नौपाड्यात यापूर्वी युती असतांनाही भाजपाने उमेदवार दिला होता, परंतु त्याचा पराभव झाला. विटाव्यातही पोटनिवडणुकीत आम्ही त्यांच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती. हीच परंपरा अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली, मोखाडा, पालघरमध्ये आम्ही अबाधीत ठेवली आहे. त्यामुळे नवऱ्याबरोबर बायकोला नांदायचेच नसेल तर आम्हीदेखील एकट्याने संसार करण्यासाठी सज्ज आहोत, असा खोचक सल्ला सेना नेत्यांनी दिला.एकूणच शिवसेनेनेही स्वबळावर लढण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा संदेश देण्यास सुरूवात केली आहे. त्याची तयारी दोन महिन्यांपासूनच सुरु होती. विभागीय मेळावे घेत घेत आता या तयारीला अंतिम स्वरुप आले आहे. याच माध्यमातून आम्हीही स्वबळाची चुल तेवत ठेवण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराच त्यांनी भाजपाला दिला आहे. युती तोडायचीच असेल तर मग केवळ महापालिकेपुरती तोडू नका, संपूर्ण राज्यातील युती तोडा, असा दमही शिवसेनेने शहर भाजपाला भरला आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात सेनेचीही स्वबळाची तयारी
By admin | Updated: January 14, 2017 06:21 IST