नवी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. परंतु बाप्पाचे मनमोहक रूप अनुभवायला आलेल्या याच भक्तांचा सुरक्षेच्या बाबतीत मोठमोठ्या मंडळांची सुरक्षा मात्र फोल ठरली आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून या मंडळांच्या सुरक्षा व्यवस्थापनाची पाहणी केली असता यावेळी या मंडळांचा बेभरवशाचा कारभार निदर्शनास आला. सीबीडीमधील काही गणेश मंडळांना भेट दिली असता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा सुरक्षेसाठी मात्र या मंडळाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे पाहायला मिळाले. सीबीडीमधील काही मंडळांच्या आवारात संशयास्पद बॅग ठेवण्यात आली. आजूबाजूला मंडळाचे कार्यकर्ते वावरत होते. दर्शनासाठी बाहेर भाविकांची रांग लागली होती. काही काळासाठी ती बॅग मंडळाच्या आवारात तशीच पडून होती, तरीदेखील याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. विशेष म्हणजे मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी याकडे संशयास्पद दृष्टीने पाहिले नाही. काही वेळानंतर पुन्हा त्या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर ती बॅग त्याच ठिकाणी आढळून आली. यावरून सुरक्षेच्या बाबतीत असलेला मंडळाचा निष्काळजीपणा समोर आला. १० दिवसांच्या उत्सवात दिवसागणिक शेकडो भाविक या मंडळांना भेट देत असतात, असे असूनही या भाविकांच्या सुरक्षेकडे मात्र कानाडोळा होत असल्याचे पाहायला मिळाले.सीबीडी-बेलापूर परिसरात १५ पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. बऱ्याच मंडळांमध्ये दुपारच्या वेळेत गणेशमूर्तीजवळ कोणतेही कार्यकर्ते नसतात. येणाऱ्या भाविकांकडे कोणाचेच लक्ष नसते. अशा वेळेत कोणतीही अनोळखी व्यक्ती मंडळात शिरू शकते आणि एखादे दुष्कृत्याही घडू शकते. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित विचारपूस करण्यात यावी, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत.
बेलापूरमध्येही मंडळांची सुरक्षा ठरली फोल
By admin | Updated: September 21, 2015 03:30 IST