डोंबिवली : कोरोना लाटेच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सोमवारी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीणमधील शाळा बंद करण्यासंदर्भात पत्र काढले. त्यामुळे कल्याण ग्रामीणमधील विद्यानिकेतन, चंद्रेश लोढा मेमोरियल स्कूलसह अन्य एका कॉन्व्हेंट शाळेने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
यासंदर्भात विद्यानिकेतनचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी इयत्ता सातवीपासूनचे पुढील वर्ग सुरू केले होते. मात्र, ठाणे ग्रामीण शाळा बंद ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करताच आम्ही शाळा तूर्त बंद करण्याचे ठरवले आहे. पालकांना त्यासंदर्भात शाळेच्या ॲपद्वारे सूचित केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या तत्त्वावर शाळा बंद राहणार आहेत. इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग पुढील काळात कसे सुरू करता येतील, याबाबत विचार सुरू आहे.
---------------