उल्हासनगर : ढोल ताशांच्या गजरात, विविध देखाव्यासह पांरपांरिक वेशात नववर्षानिमित्त स्वागतयात्रा काढण्यात आली. चौकाचौकात फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. यात्रेत सहभागी झालेल्यांकरिता ठिकठिकाणी अल्पोपहार, सरबत व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले गेले.उल्हासनगर पूर्वेकडील महादेव नगर, संतोष नगर, व्हिटीसी मैदान मार्गे निघालेल्या यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी केले. महिलांसह शालेय विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, पुणेरी ढोल-ताशे, राम, कृष्ण, हनुमान, वानर सेना आदी देवदेवतासह अनेक नागरी समस्येवरील देखावे यात्रेत सहभागी होते. पुरुषांबरोबरच महिलांनी पांरपांरिक वेश परिधान करून डोक्यावर भगवे फेटे बांधल्याने वातावरण भगवे झाले होते. महिलांनी मोटारसायकल रॅली काढून यात्रेची शान वाढवली. स्वागतयात्रेत महापौर अपेक्षा पाटील, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे, सभागृह नेते धनजंय बोडारे, नगरसेवक शेखर यादव, नाना सावंत, सोनु चान्पुर, विजय सावंत, नगरसेविका वसुधा बोडारे, शीतल बोडारे आदी सहभागी झाले होते.शहर पश्चिमकडील स्वागतयात्रा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निघाली. यात्रेत विविध समस्यावरील देखावे सहभागी होते. देवदेवता, बाल शिवाजी, जिजामाता यांची वेशभूषा केलेली लहान मुले घोड्यावर बसून यात्रेत सहभागी झाली होती. यात्रेत शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, नगरसेवक विजय सुफाळे, माजी महापौर व नगरसेविका राजश्री चौधरी, नाना बागुल, जयकुमार केणी, शिवाजी जावळे यांच्यासह शालेय मुले व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. शहरात मराठी संस्कृती रूजवण्यासाठी व वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षा पासून स्वागतयात्रेचे आयोजन केल्याची माहिती चंद्रकांत बोडारे यांनी दिली. (प्रतिनिधी)
देवदेवतांचे आणि नागरी समस्यांचे देखावे
By admin | Updated: March 29, 2017 05:41 IST