भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढाधाम येथून ठाण्याकडे पायी जात असलेल्या १२ जैन साध्वींच्या गटाला माणकोलीजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन साध्वींचा जागीच मृत्यू झाला, तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. साध्वी रंजना हिराचंद जैन (५२) व रणवी (४०) अशी मृत्यू झालेल्या साध्वींची नावे आहेत. साध्वी शकुंतला चोप्रा व सुनीता (४२) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा १२ साध्वींचा गट झारखंडहून आला होता आणि तो ठाणे येथे परतत होता. या साध्वी माणकोली बायपास नाक्याजवळील अरुणकुमार क्वारीसमोर असताना पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दोन साध्वींचा मृत्यू ओढवला. या अपघातातून साध्वी कल्पिसता चोप्रा व नीशा मेहता बचावल्या आहेत. याप्रकरणी ट्रकचालक दया शंकर यादव (४५) याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे आणि ट्रक जप्त केला आहे. (प्रतिनिधी)
ट्रकच्या धडकेत साध्वींचा मृत्यू
By admin | Updated: April 24, 2017 23:40 IST