ठाणे : सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवासस्थानी जाण्यासाठी लांबचा वळसा पडू नये, याकरिता चक्क हायवेजवळील फुटपाथच मधून कापण्याचा प्रताप झाला आहे. त्यामुळे येथील ‘हरित जनपथा’वर सकाळ-संध्याकाळी चालायला येणाºया ज्येष्ठ नागरिकांसह पादचाºयांना याचा नाहक त्रास होणार आहे. याबाबत, महापालिकेच्या अधिकाºयांना विचारले असता फुटपाथ कोणी कापला, त्याची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगत त्यांनी कानांवर हात ठेवले.नितीन कंपनीजवळील काजूवाडी भागात जाणाºया हायवेवरील फुटपाथच पालिकेने कापला आहे. जेथून हा फुटपाथ कापण्यात आला, तेथून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी थेट गाडी जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठीच पालिकेने हा खटाटोप केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या फुटपाथचे काम करण्यात आले होते. तसेच येथे एक ओपन जिमदेखील उभारली आहे. त्यामुळे सकाळ -संध्याकाळ येथे पादचाºयांची वर्दळ असते. पालकमंत्र्यांच्या सोयीकरिता फुटपाथ कापल्याच्या स्थानिकांच्या आरोपात तथ्य असले, तरी केवळ पालकमंत्र्यांची मोटारच तेथून जाणार नाही. सर्वच वाहने येजा करतील. त्यामुळे पादचाºयांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. पालकमंत्र्यांना आतापर्यंत घरी जाण्याकरिता पुढील बाजूने यू-टर्न घ्यावा लागत होता. तेथे खाजगी बसेसचा गराडा असतो. बसमालकांचे वाहतूक पोलिसांशी लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. सायंकाळी येथे प्रचंड वाहतूककोंडी असते. त्यामुळे या कोंडीत पालकमंत्री अडकून पडू नये, याकरिता हा खटाटोप केल्याचे स्थानिक सांगतात.निवडणूक काळात प्रशासनाशी निर्माण झालेला दुरावा दीड महिन्यापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीद्वारे दूर केला. त्यानंतर, गेल्या दोन महासभांत प्रशासनाचे प्रस्ताव झटपट मंजूर झाले.कापलेल्या फुटपाथमधून सरसकट वाहने जाऊ लागली आणि कुणाला वाहनाचा धक्का लागला, तर त्याला जबाबदार कोण? मंत्र्यांचे लाल दिवे काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीव्हीआयपी कल्चर संपुष्टात आणू पाहत असताना फुटपाथ कापून रस्ता करणे, हे व्हीव्हीआयपी संस्कृती पोसण्याचे लक्षण नव्हे का, असा स्थानिकांचा सवाल आहे.महापालिकेचे नगरअभियंता रतन अवसरमोल यांच्याशी संपर्क साधला असता फुटपाथ कापून रस्ता बनल्याची काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा उद्योग कोणी केला, याबाबत संभ्रम आहे.
सारे पालकमंत्र्यांच्या सोयीसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:59 IST