लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाने मार्च महिन्यात डोके वर काढायला सुरुवात केली आहे. भिवंडीतही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात असलेला कोरोना हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत रोज पाच ते सात असलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यात दुपटीने वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात भिवंडी शहरातील रुग्णसंख्या १६६ वर पोहोचली, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही २०५ दिवसांवर आला आहे.
इतर शहरांच्या तुलनेने भिवंडीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली असली तरी भिवंडीकरांकडून कोरोना नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही हे वास्तव आहे. मनपा व पोलीस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडवसुली सुरू केल्याने कोरोनापेक्षाही पोलिसांच्या भीतीनेच भिवंडीकरांच्या तोंडावर मास्क दिसत आहेत. विशेष म्हणजे पोलीस व मनपाच्या दंडवसुली मोहिमेमुळे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत असून शहरातील सार्वजनिक उत्सव व लग्न समारंभात फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र शहरात असलेल्या सर्वच भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करताना दिसतात. भाजी मार्केटच्या या गर्दीवर प्रशासनाला नियंत्रण ठेवण्यात फारसे यश आलेले नाही. त्याचबरोबर शहरातील काही हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन केले जात असले तरी शहराजवळ व महामार्गांवर असलेल्या ढाब्यांवर मात्र रात्री गर्दी दिसते. त्यातही काही ढाब्यांवार मोकळी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे, तर काही ठिकाणी तीनतेरा वाजलेले आहेत.
मनपा व पोलीस प्रशासन तसेच ग्रामीण यंत्रणा जशी दिवसा कोविड नियमांची सक्ती करताना दिसते तशी रात्री होताना दिसत नसल्याने सायंकाळनंतर भिवंडीत कोविड नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही.
===Photopath===
210321\img-20210321-wa0014.jpg
===Caption===
रियालिटी चेक -
भिवंडीत भाजी मार्केट मध्ये सकाळची गर्दी कायम