अगोदरच खड्डे असलेले रस्ते केबलसाठी खोदणार; जि.प.चा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:27 PM2019-10-27T23:27:09+5:302019-10-27T23:27:25+5:30
कंपनीकडे नेट कनेक्शनची मागणी
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील रस्ते यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झाले असतानाच आता ठिकठिकाणच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने जिओ इन्फोच्या केबल टाकण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मंजुरीसाठी रेटला जात आहे. मात्र आधीच खराब झालेले रस्ते केबल टाकण्याकरिता खोदून ठेवल्यास रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे असून या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या ग्रामीण रस्त्यांवरून गावखेड्यातील रूग्णांना दवाखान्यात नेणेही जोखमीचे झाले आहे. त्यात या जिओ केबलसाठी रस्ते खोदले जाणार आहेत. यामुळे अगोदरच खड्डे पडलेले रस्ते सुधारणे तर दूरच राहिले खराब होण्याची शक्यता आहे. कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील तब्बल चार रस्ते खोदून त्यांच्या दोन्ही बाजुला या केबल टाकल्या जाणार आहेत. एखाद्या कंपनीच्या फायद्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते खोदण्यास जिल्हा परिषदेच्या सदस्यांंनी विरोध केला आहे. मात्र कंपनीच्या सततच्या रेट्यामुळे बांधकाम विभाग परवानगी देण्याच्या विचारात आहे.
या रस्त्यांची डागडुजी करण्याचा खर्च केबल टाकल्यावर कंपनीने करावा, अशी अट प्रशासनाकडून घालण्यात आली आहे. जिओ कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय कार्यालयांना दोन एमबीपीएस नेट कनेक्शन विनाशुल्क देण्याची अट कंपनीला घातलेली आहे. या मोफत नेटसेवेची अट कंपनी मान्य करील, असे संकेत आहेत. पण केबलच्या कामांसाठी रस्ते खोदण्याचा फटका ग्रामस्थानाच बसणार आहे. मुरबाड तालुक्यातील शिवळे तुळई देहरीे हा रस्ता तब्बल ७०० मीटर बाधीत होणार आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी सहा लाख ८२ हजारांची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.