उल्हासनगर - शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगरात विविध विकासकामे अर्धवट असल्याचा फटका शहरवासियांना बसत आहे. वर्षानुवर्ष अर्धवट कामे ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी नोटीसा दिल्या जात आहे. महापालिकेच्या अश्या ढिसाळ कारभारावर सर्वस्तरातून टिका होत असून ठेकेदार महापालिकेला वरचड झाल्याची चर्चा सुरु झाली. कॅम्प नं-३, मयूर हॉटेल व आयटीआय, शासकीय तांत्रिक विद्यालय समोरील रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, मुलांना नाल्यावरील लोखंडी जलवाहिनीवरून भरपावसात जीवघेणा प्रवास करावा लागतो. या जलवाहिनीवरून जाताना मुलांचा पाय घसरला तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिका आयुक्तानी अश्या विकास कामावर लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराना नेहमी प्रमाणे नोटीसा न देता कारवाई करण्याची मागणी होत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्ता बांधणीसाठी ६८ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र काम गेल्या ३ वर्षापासून १० टक्केही झाले नाही. आजही काम ठप्प आहे. हीच परिस्थिती मुख्य ७ रस्त्याचे असून एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून या रस्त्याचे काम सुरु आहे. तर ४२६ कोटीच्या भुयाटी गटार योजने अंतर्गत शहरातील रस्ते गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदण्यात येत आहे. मात्र त्याची दूरस्ती तांत्रिक पद्धतीने झाली नसल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे. लहान-मोठे अपघात नेहमीचे झाले असून रस्त्यात वाहने फसण्याची व नागरिक पडून जखमी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.