ठाणे : केंद्रात भाजपाच्या कोट्यातील मंत्रीपद उपभोगतानाही ठाण्यात रिपाइंच्या आठवले गटाला भाजपाकडून अपेक्षित २० जागा न मिळाल्याने युती तोडण्याची घोषणा करणारे नेते आपल्या गोतावळ््यासह शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर हजर असल्याने तो मनोरंजनाचा विषय बनला होता.या गटाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले. पण मुख्यमंत्र्यांसमोर भाषण करतांना रिपाइंचे ठाणे शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी भाजपाबरोबर असलेली युती ही ठाण्यात नसून संपूर्ण देशात असल्याचे जाहीर करून टाकले. भाजपाने जाहीर सभेतच रिपाइंना आपलेसे केल्याने पुन्हा भाजपाच्या काही उमेदवारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.शिवसेनेशी युती तुटल्यावर भाजपाने आपल्या छोट्या मित्र पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेतला. त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे पक्षाच्या नेत्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. रिपाइंने थेट २० जागा मागितल्या. यादी जाहीर झाल्यावर त्यांची केवळ चार जागांवर बोळवण करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या रिपाइंनी भाजपाशी युती तोडून स्वबळावर १० जागा लढण्याचा नारा दिला. भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शनिवारी ठाण्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपवन येथील सभेवेळी रिपाइंचे सर्व उमेदवार स्टेजवर हजर होते. आधी युतीविरोधात भाषा करणारे तायडे यांनी भाषण करतांना भाजपाबरोबरची युती ही ठाण्यापुरती नसून संपूर्ण देशात असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही लढाई केवळ जागांपुरती होती ते स्पष्ट झाले. ते ज्या प्रभागातून उभे आहेत, तेथे संजय घाडीगावकर यांचे मेहुणे उभे आहेत. त्यामुळे याचा फटका त्यांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घाडीगावकर नाराज झाले आहेत. रामभाऊ तायडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो असल्याचे सांगत त्यांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
रिपाइंचा गोतावळा व्यासपीठावर
By admin | Updated: February 13, 2017 05:00 IST