नवीन रुग्णा पेक्षा, बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण जास्त
उल्हासनगरात कोरोना रुग्णाला लागली ओहोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने, रुग्णालयातील अर्धे बेड शिल्लक असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमाला यश आले असून, अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
उल्हासनगरात गेल्या महिन्यात दररोज २००पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत होते. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांवर बेड मिळण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली होती. राज्य शासनाच्या `ब्रेक द चेन` योजनेत लागू केलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी शहरात झाल्याने व नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. २६ एप्रिल रोजी ८४, २७ एप्रिल रोजी ९१, २८ एप्रिलला १४०, २९ एप्रिलला १३१, ३० एप्रिलला १०७, १ मे रोजी ११०, २ मे रोजी ७४ तर ३ मे रोजी ५४ अश्या नव्या रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या मोठी असून, शहरात आजमितीस एकूण १३३७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.
आजपर्यंत नागरिकांनी जसा संयम पाळला असाच संयम आणखी काही दिवस पाळला तर, शहर कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅम्प नं-४ येथील कोविड रुग्णालय, साई प्लॅटिनम रुग्णालयासह आरोग्य केंद्रातील अर्धे बेड रिकामे असल्याने, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व संबंधित कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.
........
वाचली