कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आलेली ३२ कोटी रुपयांची निविदा ही ४० टक्के जादा दराची आहे. त्यामुळे ती स्वीकारायची की नाकारायची, यावर अजूनही निर्णयच झालेला नाही. तसेच निविदा भरणारी कंत्राट कंपनी दर कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी पुन्हा फेरनिविदाच मागवली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत नऊ वेळा निविदा मागवल्या आहेत.महापालिका हद्दीतील घनकचरा व डम्पिंग ग्राउंडप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करताना एप्रिल २०१५ मध्ये महापालिका हद्दीतील नव्या इमारतीच्या बांधकामास परवानगी देण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर, महापालिका जागी झाली. एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान महापालिकेच्या हद्दीतील नव्या इमारतीच्या बांधकाम मंजुरीस स्थगिती मिळाली होती. न्यायालयाने ही स्थगिती तात्पुरती उठवली आहे. मात्र, तातडीने प्रकल्प राबवण्याची सूचना केली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा मागवली. २८ कोटी रुपयांची निविदा ‘आधारवाडी’साठी आली. तर, बारावे भरावभूमीसाठी १९ कोटींची निविदा आली. या प्रकल्पांना होणारा विरोध पाहता कंत्राटदाराने काढता पाय घेतला. त्याला नोटिसा बजावूनही त्याने प्रतिसाद दिला नसल्याने महापालिकेने ‘आधारवाडी’प्रकरणी निविदाधारकांची २८ लाख रुपये अनामत तर बारावे भरावभूमी निविदाधारकाची ३२ लाख रुपये अनामत रक्कम जप्त केली. महापालिकेने त्यानंतर ‘आधारवाडी’साठी फेरनिविदा मागवली. नवी मुंबईतील गिरीश एंटरप्रायझेसने ३२ कोटींची निविदा भरली आहे. ही निविदा ४० टक्के जास्त दराची आहे. एकच निविदा आल्याने स्पर्धा निर्माण झालेली नाही. त्यामुळे ती स्वीकारायची की नाही, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. दर कमी करण्याबाबत कंपनीशी चर्चा करूनही काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही निविदा नाकारली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. फेब्रुवारी ते सप्टेंबरदरम्यानचे सात महिने वाया गेले आहेत. प्रकल्प उभारण्यासंदर्भात काय प्रगती केली आहे, याची माहिती महापालिकेने १२ आॅगस्टला नव्याने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली आहे. ‘आधारवाडी’च्या निविदेसंदर्भात महापालिकेचा ठोस निर्णय अजूनही झालेला नाही. बारावे, मांडा आणि उंबर्डे येथे भरावभूमी प्रकल्प उभारण्यासाठी फेरनिविदा मागवली आहे. या तिन्ही निविदा ९ आॅक्टोबरला उघडण्यात येणार आहेत.
‘आधारवाडी’ची फेरनिविदा
By admin | Updated: September 9, 2016 02:46 IST