मीरा रोड : रिझर्व्ह बँकेने कपोल सहकारी बँकेचे सर्व व्यवहार गोठवले असून खातेधारकांना केवळ तीन हजार देण्याचे आदेश दिल्याने बँकेच्या भार्इंदर शाखेत खातेधारकांनी मोठी गर्दी केली होती. कपोल बँकेच्या १५ शाखा व अन्य विभाग आहेत. पण अनागोंदी कारभार व मोठ्या प्रमाणात दिलेल्या कर्जांची वसुली होत नसल्याने बँक डबघाईला आली आहे. त्यातच गुरूवारी रिझर्व्ह बँकेने आदेश काढून बँकेचे सर्व व्यवहार थांबवले. खातेधारकास सहा महिन्यांदरम्यान केवळ एकदाच ३ हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. शुक्रवारी सकाळी भार्इंदरच्या गोडदेव नाक्यावर असलेली शाखा उघडली तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने खळबळ उडाली. पैसे काढण्यासाठी आलेल्या खातेधारकांना पैसे मिळणार नसल्याचे ऐकून धक्काच बसला. हा धक्का सहन न होऊन ते चक्कर येऊन खाली पडले. खातेधारकांनी व्यवस्थापकास घेराव घालत धारेवर धरले. बँक बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि खातेधारकांनी बँकेकडे धाव घेतली. तणाव वाढत असल्याने पोलिसांना बोलविले. नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी खातेधारकांना शांततेचे आवाहन केले. शिवाय बँकेच्या व्यवस्थापकास खातेधारकांसमोर आणून वस्तूस्थिती कथन करायला सांगितले. (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेचे कपोल बँकेवर निर्बंध
By admin | Updated: April 1, 2017 05:44 IST