अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात मुंबई विभागातील ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर-०१ आणि मुंबई उपनगर-२ अशा पाच जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याचा निकाल तब्बल ८९.७९ टक्के लागला आहे. ठाणे-८९.७५, बृहन्मुंबई-८८.२७, मुंबई उपनगर(१)-८८.७४ आणि मुंबई उपनगर(२)-८६ टक्के निकाल लागला आहे.जिल्ह्यातील ५०७ शाळांमधील २० हजार ३९२ मुले तर १८ हजार ४५ मुली अशा ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. तर २० हजार ३४८ मुले तर १८ हजार ०१२ मुली असे एकूण ३८ हजार ३६० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९१.८९ टक्के म्हणजे १६ हजार ५५२ मुली तर ८७.९२ टक्के म्हणजे १७ हजार ८९० मुले उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण होण्यात जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९८ विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ११ हजार ८२१, द्वितीय श्रेणीत १२ हजार ९८८ तर उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
रायगडच अव्वल
By admin | Updated: June 18, 2014 03:20 IST