अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेंद्रातील मोदी सरकारने स्वच्छतेचा नारा देताच डोंबिवलीतील रघुवीरनगरच्या काही महिलांनी एकत्र येत वॉर्डाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली. त्यासाठी प्रगत परिसर व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी तो उपक्रम सुरु ठेवला आहे. त्याची दखल घेऊन नगरसेवकाने महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावून सफाई करण्याचा कानमंत्र दिला. त्यासाठी प्रत्येक सोसायटीत मोठे डस्टबीन ठेवण्यात आले आहेत. आता कुठे हा वॉर्ड कचराकुंडी मुक्त होत आहे.याच ठिकाणी केडीएमसीतील एकमेव ट्रॅफिक गार्डन आहे. कै. सुरेंद्र वाजपेयी यांच्या संकल्पनेतून त्याची निर्मिती केली होती, आता त्याचा भार येथील राजेश मोरे वाहत आहेत. बुधवारी त्याचे नामकरण स्व. मीनाताई ठाकरे ट्रॅफिक गार्डन असे करण्यात आले. त्यासाठी मंगळवारचा दिवसरात्र एक करुन त्याची जमेल तशी डागडुजी करण्यात आली. त्यासाठी पालकमंत्री बुधवारी आले होते. परंतु, असे असतांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असणारी ‘सिग्नल यंत्रणा’ कार्यान्वीत करतांना मात्र महापालिका, वाहतूक विभागाला अपयश आले आहे. त्यामुळेच केवळ या गार्डनमध्येच नव्हे तर चार रस्ता येथेही ती यंत्रणा नाही. परिणामी त्याचा त्रास सर्व डोंबिवलीकरांना होतो. पाच वर्षात चार रस्त्याची सिग्नल यंत्रणा केवळ अभावानेच सुरु होती. ती पूर्णपणे सुरु व्हावी, अॅक्टीव्ह रहावी यासाठी मात्र कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. विशेष म्हणजे या वॉर्डाच्या शुभारंभापासूनच शहरातील मानपाडा या रस्त्याचे आरसीसी रोड करण्यात आला. त्यातून वाहतूककोंडी सुधारेल, तसेच वाहने वेगाने धावतील असा विश्वास होता. परंतु, या दोन्ही बाबी जैसे थे असून अर्धवट आरसीसीमुळे कोणताही उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे शेकडो वाहनचालक त्रस्त आहेत. हीच समस्या शिवमंदिर चौकातही भेडसावते. तेथेही सकाळी व संध्याकाळच्या वेळेत प्रचंड ट्रॅफिक होते, त्यामुळेही नागरिक त्रस्त असतात. याच ठिकाणी महापालिकेच्या डोंबिवली शहरातील एकमेव वैकुंठ स्मशानभूमीचा भूखंड आहे. शहरातील बहुतांशी सर्वच अंत्यसंस्कार येथे होतात. या ठिकाणच्या समस्या अनेक वर्षात सुटलेल्या नाहीत. आता कुठे निवडणुकीच्या तोंडावर तेथील सुविधांसाठी सुमारे ५० लाखांच्या निधीची तरतूद केली. याच ठिकाणी सुमारे १०८ वर्षांचा इतिहास असलेले प्राचिन शिवमंदिर आहे. परंतु, सण उत्सवाच्या विशेषत: श्रावण, महाशिवरात्री आदींच्या सणांमध्ये भक्तांची महापालिकेकडून अथवा नगरसेवकाकडून कोणतीही विशेष काळजी घेतली जात नसल्याचे जनतेचे गाऱ्हाणे आहे. केवळ नाना - नानी पार्क हे ज्येष्ठांसाठी विरंगुळ््याचे साधन आहे. तेथेच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीचा प्रस्ताव असून अद्याप तरी त्यास मूर्त रुप आलेले नाही. केवळ लेवा भवन परिसरात एलईडी पथदिवे लागले असून अन्यत्र कधी लागणार याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. सर्वाधिक वर्दळीचा हा परिसर असल्याने येथे वाहतूककोंडीसह चेन स्रॅचिंगचे प्रमाण अधिक आहे. ते कमी व्हावे यासाठी नगरसेविकेने आता कुठे सीसी कॅमेरे लावण्याचे काम हाती घेतले आहे. पण हे सारे निवडणुकीच्या तोंडावरच का होते आहे ? असा सवाल जनतेचा आहे.
रघुवीरनगर झाले कचराकुंडी मुक्त
By admin | Updated: September 25, 2015 02:14 IST