अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पावसाळ्यात खराब होणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अवघ्या वीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या २० लाखांमध्ये केवळ रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम केले जाते. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील बहुसंख्य मुख्य रस्ते हे काँक्रीटचे झाल्याने पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीसाठी अल्प निधीची तरतूद केली आहे.
शहरातील गोविंद तीर्थपुरी रस्ता आणि लोकनगरीकडे जाणारा रस्ता हे दोन प्रमुख रस्तेच डांबरीकरणाचे असून, तेच रस्ते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होतात. इतर शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत पावसाळ्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी अल्प निधीची तरतूद करून ठेवली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम वार्षिक मंजूर दरातून करण्यात येत असून, ते काम एम.डॅक नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने यंदाच्या पावसाळ्यात लोकनगरी रस्त्याची दुरुस्ती केली असून, त्यासोबत गोविंद तीर्थ पुलावरील खराब झालेला रस्ता आणि चिंचपाडा खदानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती केली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते नगरपालिका पावसाळ्यात दुरुस्त करत नसल्यामुळे खर्चाची तरतूद कमी ठेवली जाते.
-----------