मुंबई: राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या विविध दुर्घटना आणि त्यात झालेले नागरिकांचे मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.
मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडल्याने नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी संबंधित रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका, प्रशासकीय यंत्रणा आदींची बैठक घेऊन रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
सौनिक म्हणाल्या, पावसाळा आणि त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात सर्व यंत्रणांनी अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. रेल्वेने या कालावधीसाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करून आवश्यकता भासल्यास निवृत्त आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण, महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, यांच्यासह रेल्वे, महसूल, गृह, परिवहन, नगरविकास आदी विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी ज्या भागात नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, त्याच भागात आवश्यक माहिती प्रसारित होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.
चुकीची माहिती पसरू नयेदुर्घटनेच्या काळात चुकीची माहिती पसरू नये, याची दक्षता घेण्याची सूचना मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी केली. त्या म्हणाल्या, तातडीने आणि योग्य माहिती नागरिकांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी. याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सर्वत्र बॅगेज स्कॅनर लावण्यात यावेत. दुर्लक्षित बॅगा तसेच कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.