मुंबई : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाबाबत मालाड पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून तक्रारी करूनही याप्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार कविता सुरंजे या महिलेने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीत याबाबतचा तक्रारअर्ज शेजारच्या चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवल्याचे आश्चर्यकारक माहिती पोलिसांनी दिली आहे. मालाड येथे राहाणाऱ्या कविता हिचा शहापूर येथील आसनगाव येथे राहाणाऱ्या देविदास सुरंजे याच्याही विवाह झाला. विवाहानंतर दिड -दोन वर्षांपासून पती तसेच दिर, जाऊ, सासू, सासरा, नणंद यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची कविताची तक्रार आहे. याबाबत तिने ५ मे २0१३ रोजी मालाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. २९ सप्टेंबर २0१३ रोजी मालाड पोलिसांनी कविताचा जबाब नोंदवला. त्यानंतर कविताने १ आॅक्टोबर २0१३ रोजी अदखलपात्र तक्रारही दाखल केली. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण समझोत्यासाठी महिला सहाय्य कक्षाकडे पाठवले. तेथे आपल्या पतीने यापुढे आपला छळ करणार नाही आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करू, असे लेखी पत्र दिले. मात्र पुन्हा शहापूर येथे गेल्यावर बेदम मारहाण करून आपला छळ सुरू झाला. त्याबाबतही शहापूर पोलीस ठाण्यातही अदखलपात्र तक्रार नोंदवली व आपण मालाड येथे माहेरी आल्याचे कविताने सांगितले. पोलिसांनी याबाबत कोणतीच कारवाई न केल्याने राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत मालाड पोलीस ठाण्याकडे माहिती अधिकारामार्फत माहिती मागितली असता कविता सुरंजे यांचा अर्ज मालाड पोलीस ठाण्याला प्राप्त झाला असून तो पुढील चौकशीसाठी चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. तक्रारदार महिला मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाते. तिच्या शारीरिक आणि मानसिक छळाच्या तक्रारीबाबत चौकशी करून कारवाई करण्याऐवजी तक्रारअर्ज कोणताही संबंध नसलेल्या चारकोप पोलीस ठाण्याकडे पाठवणे आश्चर्यकारक असल्याने याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
छळप्रकरणी कारवाईस टाळाटाळ
By admin | Updated: February 15, 2017 04:36 IST