ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:54+5:302021-02-16T04:40:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असतांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील आगामी ठाणे ...

Possibility of failure in Maha Vikas Aghadi in Thane | ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असतांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडी दिसत असली तरी ठाण्यात मात्र महापालिकेवर पुन्हा एकहाती भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लढती पाहावयास मिळणार आहेत.

राज्यात सध्या महाविकास आघाडी दिसत आहे, परंतु, ठाण्यात मागील महिन्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आगपाखड केली जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी देखील केली. परंतु,आता येत्या काळातही महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचेच दिसत आहे. काँग्रेसने दोन महिन्यापूर्वीच आगामी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या वरिष्ठांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट कामाला लागा, आपल्याला निवडणूक स्वबळावर लढायची आहे, असे आदेश काढले आहेत, त्यानुसार शिवसेनेचे तळागाळातले कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी देखील कामाला लागले आहेत. या मागचा शिवसेनेचा हेतू स्वबळावर लढल्यास जागा वाटपावरून होणारा घोळ टाळला जाणार आहे, तसेच नगरसेवक फुटीला देखील यामुळे लगाम बसणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे, त्या ठिकाणचे नगरसेवक फोडण्याचा डावही शिवसेनेचा असून त्यामुळे जागा वाढणार असल्याचे त्यांचे मत आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ७५ ते ८० जागा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना देखील आखली आहे.

त्यातही शिवसेनेने भाजप विरुद्ध शून्य मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणूनही स्वबळाचा नारा दिला गेला आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी देखील सामील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी भाजपची पकड असणार आहे, त्या ठिकाणी अंडरस्टॅन्डिंग करून शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असून त्यानुसार अधिक उमेदवारांना संधी देतांना, फोडाफोडीच्या राजकारणाला यामुळे अंकुश बसेल असा दावा केला आहे. परंतु राष्ट्रवादीचा वरचष्मा हा राबोडी, लोकमान्यनगर या पट्ट्यात आहे. तर कळवा आणि मुंब्य्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला वाढावे लागणार आहे. परंतु, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य असेल त्या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला जाणार आहे. तर ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्याठिकाणी राष्ट्रवादी कमजोर उमेदवार देणार आहे. त्यानुसार हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. त्यात काँग्रेस किती तग धरणार हे पाहणे महत्वाचे आहे, यापूर्वी काँग्रेसच्या मुंब्य्रातून अधिक जागा निवडून येत होत्या. परंतु, मागील निवडणुकीत काँग्रेसचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसने सध्या मुंब्य्राकडेच अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Possibility of failure in Maha Vikas Aghadi in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.