उल्हास नदीत प्रदूषण एकीकडे, तर नमुने भलतीकडचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:43 AM2019-12-30T00:43:59+5:302019-12-30T00:44:02+5:30

माहिती अधिकारातून उघड; प्रदूषण मंडळाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

Pollution in the Ulhas River is on the one hand, and the samples on the other | उल्हास नदीत प्रदूषण एकीकडे, तर नमुने भलतीकडचे

उल्हास नदीत प्रदूषण एकीकडे, तर नमुने भलतीकडचे

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : उल्हास नदीच्या पाण्याचा रंग, वास आणि स्थिती पाहूनच तज्ज्ञ नसलेली व्यक्तीही नदी प्रदूषित असल्याचे सांगू शकेल. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ या गंभीर समस्येकडे डोळेझाक करत असल्याची बाब उल्हास नदी बचाव कृती समितीने माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. मंडळाच्या वेबसाइटवर चुकीची माहिती दिली जात आहे. नदीच्या प्रदूषित भागातील पाण्याचे नमुने न घेता भलत्याच ठिकाणचे नमुने गोळा करून मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात अपिलात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उल्हास नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य रवींद्र लिंगायत यांनी प्रदूषण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. २०१७ ते २०१९ या कालावधीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणाच्या ठिकाणचे किती पाण्याचे नमुने गोळा केले? त्यांचा अहवाल काय आला? याच्या साक्षांकित प्रतींसह माहिती दिली जावी, असे म्हटले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा प्रकारच्या साक्षांकित प्रती त्यांच्याकडे उपलब्ध नसून यासंदर्भातील माहिती त्यात्या वेळी आॅनलाइनवर प्रसिद्ध केली आहे.

नदी प्रदूषित असलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रोटोकॉल, रिझल्टशीट आणि व्हिजिट नोट या स्वरूपात ही माहिती उपलब्ध असणे आवश्यकआहे. मात्र, अशी माहितीच प्रदूषण मंडळाकडे उपलब्ध नसल्याने ती लिंगायत यांना देण्यात आली नाही. मंडळाने आॅनलाइनवर उपलब्ध केलेल्या पाण्याचे नमुने घेतलेल्या ठिकाणांचे रेखांश आणि अक्षांश नमूद केले आहेत. त्यात ताळमेळ नसून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मागदर्शक तत्त्वांनुसार ते गोळा केले जात नाहीत.

प्रदूषित ठिकाणचे नमुने न घेता पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणचे नमुने घेतले जातात. प्रदूषित ठिकाणच्या वरच्या आणि खालच्या बाजूला नदीतील दोन्ही ठिकाणचे नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. ही ठिकाणेच मंडळाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेली आहेत. कल्याण-भिवंडी पूल, जांभूळ, बदलापूर, एनआरसी याच ठिकाणी नमुने घेतले जातात. कचरा, सांडपाणी, कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते, अशी ठिकाणे कर्जतपासून कल्याणपर्यंत अनेक आहेत. योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी प्रदूषित पाण्याचे नमुनेच घेतले जात नसतील, तर नदी प्रदूषणाचा अहवाल योग्य कसा काय येणार, याविषयी नदी बचाव कृती समितीचे संस्थापकीय सदस्य अश्वीन भोईर व विवेक गंभीरराव यांनी उपस्थित केला आहे.

...तर अधिकाऱ्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट देणार
नदी बचाव कृती समितीने नुकताच नदीच्या उगमस्थानापासून नदीचा दोन दिवसांचा अभ्यास दौरा केला होता. या दौºयात नदी प्रदूषित होते, त्याठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
त्याचा अहवाल आठ दिवसांत समितीच्या हाती येणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी मंडळाकडून केला जाणारा मनमानी कारभार माहिती अधिकारात समितीचे संस्थापकीय सदस्य लिंगायत यांनी उघड केला आहे.
याप्रकरणी लिंगायत मंडळाकडे अपिलात जाणार आहेत. मंडळाच्या कामात सुधारणा दिसून आली नाही, तर अधिकाऱ्यांसह त्यांच्या घरच्यांना प्रदूषित पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या जातील, असा इशाराच समितीच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.

Web Title: Pollution in the Ulhas River is on the one hand, and the samples on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.