मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेक करण्यापर्यंतचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, हप्तेबाजी व अर्थपूर्ण कारणांमुळे राजकारणी आणि प्रशासनाची माया सुटत नसल्याने फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शहरच फेरीवाल्यांच्या विळख्यात आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते, चौक हे ना फेरीवाला झोन म्हणून जाहीर केले आहेत. शिवाय, न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय व धार्मिक स्थळांपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसरात हातगाड्या-फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केलेली आहे. तर काही फेरीवाल्यांना पालिकेने पट्टे आखून दिलेले आहे. मात्र, हे केवळ कागद आणि फलकांपुरते मर्यादित राहिले आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी फेरीवाल्यांच्या गराड्यातून मार्ग काढणे जिकिरीचे बनले आहे. वाहतुकीची कोंडीही प्रचंड होते. फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने लोकांना रस्त्यातून जीव मुठीत धरून चालावे लागते. फेरीवाल्यांमुळे प्लास्टिक व अन्य कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो व ते तसाच टाकून जातात. ध्वनी व वायुप्रदूषण वाढत आहे.
सार्वजनिक रस्ते, पदपथ आदी मोक्याच्या जागा बळकावून बसायच्या आणि माज दाखवून लोकांना वेठीस धरून उपद्रव करायचा, असा हा आतबट्ट्याचा कारभार सुरू आहे. राजरोस फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत असूनही पालिका प्रशासनासह नगरसेवक-राजकारणी चिडीचूप असतात. दिखाव्यापुरती तक्रार व कारवाई केली जाते. भाजप व महापालिका प्रशासनाने नाल्यांवरही मंडई केल्या. मंडईमधील गाळेवाटपावरून गैरप्रकारांचे आरोप होत आहेत. पुन्हा फेरीवाले व हातगाड्यांनी परिसरातील रस्ते-पदपथ गिळंकृत केले आहेत. हप्तेवसुलीमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. हातगाड्या भाड्याने देणारे रॅकेट वेगळेच आहे. त्यामुळे तक्रारींनंतरही बेकायदा फेरीवाल्यांवर ठोस कारवाईच हाेत नाही. राजकारणी-नगरसेवकही त्यांच्या भागातील वाढत्या फेरीवाल्यांना रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत.
शहरात फेरीवाल्यांचे अनेक हल्ले
मीरा रोडच्या जांगीड सर्कल ते बालाजी हॉटेल मुख्य मार्गावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून जप्त साहित्य नेत असताना ५० ते ६० फेरीवाल्यांनी दगडफेक करत दांडे घेऊन हल्ला चढवला होता. जमावाच्या हल्ल्यातून अधिकारी-कर्मचारी बचावले हाेते. मीरा रोडच्या शांतीनगर व रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनीही पालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांना दगडफेक, धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले होते. भाईंदरच्या दीपक रुग्णालय गल्ली, नवघर मार्ग, शिवसेना गल्लीतही फेरीवाल्यांची मुजाेरी चालते.