लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी वर्षाला तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करीत आहे. तरीदेखील शहरातील सर्वच रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये रस्ते बांधणी आणि रस्ते पॅचवर्कच्या कामात रस्त्यांचा नसलेला समतोल, वापरलेल्या साहित्याचा सुमार दर्जा, तांत्रिक पद्धतीचा काटेकोर अवलंब न होणे, प्रत्यक्ष साहित्य व कामाच्या तुलनेत अंदाजपत्रकातील गडबड, तसेच टेंडरमधील टक्केवारीचे आरोप यामुळे खर्च वाया जात आहे.
मीरा-भाईंदरमध्ये ३०५ किमी लांबीचे डांबरी रस्ते आहेत, तर केवळ ११.५० किमी लांबीचे सिमेंट रस्ते व १.८ किमीचे कच्चे रस्ते आहेत. पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. पॅचवर्कचे काम एआयसी व गजानन कन्स्ट्रक्शन हे ठेकेदार करतात. गेल्या वर्षी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम एआयसीने केले होते, तर यंदाच्या वर्षी गजानन कन्स्ट्रक्शनला ३५ कोटींचे टेंडर मिळाले आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत पॅचवर्कच्या ठेक्याची रक्कम कित्येक पटीने वाढली आहे. २०१२-२०१३ सालात १७ कोटी ५८ लाख रुपयांचा होणारा खर्च प्रचंड वाढून आता तब्बल ३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनसुद्धा रस्ते खड्डेयुक्त, नादुरुस्तच असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
..........
मीरा रोड-भाईंदर रस्ते बांधणी कंत्राटदार
श्रीजी कन्स्ट्रक्शन, गजानन कन्स्ट्रक्शन, आरएनबी इन्फ्रा, आशापुरा कन्स्ट्रक्शन, कंचन कन्स्ट्रक्शन, रिद्धिका एंटरप्रायजेस
............
रस्त्यावरील खड्डे बुजविणारे कंत्राटदार
गजानन कन्स्ट्रक्शन
...............