उल्हासनगर : टीम ओमी कलानी भाजपाच्या दावणीला बांधली गेल्याने राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांची कोंडी झाली आहे. पुत्रप्रेमामुळे त्यादेखील अप्रत्यक्षपणे भाजपाकडे ओढल्या गेल्या आहेत. त्यातच, भाजपाच्या काही प्रभागांतील पत्रकांमध्ये थेट पप्पू कलानींसोबत राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांचे फोटोदेखील वापरले गेले आहेत. यूडीएच्या पत्रकांवर फोटोंचे राजकारण हे चांगलेच तापले असून ते रोखण्याची क्षमता स्थानिक राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही. उल्हासनगरमधून राष्ट्रवादीच्या माध्यमातून ज्योती कलानी यांनी आमदारकी जिंकली. मात्र, उल्हासनगरची राजकीय गणिते बदलत गेल्याने आणि टीम ओमी ही भाजपाकडे ओढली गेल्याने ज्योती कलानी यांनी सर्वप्रथम आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो स्वीकारण्यास प्रदेश कार्यालयाने नकारही दिला. मात्र, या निवडणुकीत त्यांचे फोटो वापरण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शहरातील बॅनरवर अद्याप भाजपा अथवा यूडीएच्या बॅनरवर ज्योती कलानी यांचे फोटो आलेले नसले तरी काही प्रभागांतील पत्रकांवर मात्र ते वापरले गेले आहेत. पप्पू कलानी, ओमी कलानी आणि ज्योती कलानी यांचे एका बाजूला फोटो, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि कुमार आयलानी यांचे फोटो छापण्यात आले आहेत. ज्योती कलानी या पुत्रप्रेमात असल्याने त्यांनी फोटोला आक्षेप घेणे, हे अपेक्षितही नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदाराचे फोटो हे थेट विरोधी पक्षाच्या अर्थात बीजेपी आणि यूडीएच्या एकत्रित पत्रकांवर छापले जात असल्याने त्याचा त्रास हा राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. ज्योती कलानी यांना याबाबत जाब विचारण्याची धमक जिल्हा राष्ट्रवादीमध्ये नसली तरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची गोची या पत्रकांमुळे होत आहे. टीम ओमी कलानी यांनी राष्ट्रवादीपासून अंतर घेऊन वेगळा मार्ग अवलंबल्यानंतर आधीच अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीला सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ज्योती यांचे फोटो विरोधकांच्या पत्रकांवर दिसू लागल्याने निवडणुकीची जबाबदारी सांभाळणारे नेते धास्तावले आहेत. या अडचणीवर मात करावी तरी कशी, या धर्मसंकटात स्थानिक नेते पडले आहेत.
भाजपाच्या पत्रकांवर चक्क राष्ट्रवादीच्या आमदारांचे फोटो
By admin | Updated: February 9, 2017 04:02 IST