ठाणे : गेल्या काही दिवसापांसून ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने ठाणे महापालिकेने ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा कोविड सेंटरच्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्लॉन्ट उभारण्यास बुधवारपासून सुरुवात केली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी करून या प्लॉन्टमधून महापालिकेला रोज १३ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या दोन प्रकल्पांतून दिवसाला अंदाजे २० मेट्रिक टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. पीएसए तंत्रज्ञानावर आधारित हे प्रकल्प असून एका प्लान्टमधून २४ तासांमध्ये जवळपास १७५ सिलिंडर्स ऑक्सिजन तयार होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे दोन प्लान्टमधून दिवसाला अंदाजे २० टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. औरंगाबादस्थित आयरॅाक्स टेक्नॅालॅाजी प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ते उभारण्यात येणार असून, यामध्ये प्रेशर स्विंग ॲडसॉप्र्शन (पीएसए) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग, बीड या शासकीय ठिकाणी, असे प्लान्ट उभे केले आहेत. त्यानुसार या कामाची वर्कऑडर संंबंधित ठेकेदारास मंगळवारी दिल्यानंतर बुधवारी पार्किंग प्लाझा कोविड सेंटर येथे तत्काळ या ठिकाणी साहित्य टाकून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यावेळी शिंदे यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, सहायक आयुक्त शंकर पाटोळे कंपनीचे प्रतिनिधी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.