सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षाच्या बैठका सुरू होऊन आवाहन व प्रतीआवाहने देण्यास सुरवात झाली. भाजपच्या हेमा पिंजानी यांनी प्रभाग क्रं-६ मधून पंचम कलानी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास उच्छुक असल्याचे सांगून राजकीय वातावरण गरम केले.
उल्हासनगर महापलिका निवडणुकीत कलानी कुटुंबाची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. सन-२००२ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांचा करिष्मामुळे राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली होती. त्यावेळी शिवसेना व भाजपा विरोधी पक्षात होते. दरम्यान कलानी यांच्या कट्टर समर्थकांनी त्यांची साथ सोडून साई पक्षाची स्थापना करून, भाजपा-शिवसेने सोबत दोस्ती करून सत्ता मिळविली. साई पक्ष, भाजप व शिवसेना यांनी कलानी कुटुंबाला ऐक दशक महापालिका सत्तेपासून दूर ठेवले. सन-२०१७ च्या महापालिका निवडणुकीत युवानेते ओमी कलानी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून ओमी टीमची स्थापन करीत, भाजपा सोबत हात मिळवणी केली. भाजपाने कलानीच्या मदतीने महापालिका सत्ता मिळून पंचम कलानी ह्या महापौर झाल्या.
दरम्यान भाजपने विधानसभेची उमेदवारी ज्योती कलानी यांना नाकारल्यावर, ओमी कलानी टीमने राष्ट्रवादीत प्रवेश केला. ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देत, महापालिकेतील भाजपा सत्ता उलथून टाकून शिवसेनेचा महापौर निवडून आणला. महायुती व महाविकास आघाडीच्या प्रयोगात ओमी कलानीसह समर्थकांनी शिंदेसेनेकडे दोस्तीचा हात उभे करून युती केली. शिंदेसेना, ओमी टीम, साई पक्ष, रिपाई आठवले गट, कवाडे गट यांच्या बैठका सुरू झाल्या. तर दुसरीकडे भाजपाने इनकमिंग प्रवेश सुरू ठेवून पक्ष ताकद वाढविण्यास सुरवात केली. भाजपाची धुरा एकेकाळचे कट्टर पप्पू कलानी समर्थक असलेले राजेश वधारिया यांच्याकडे असून आमदार कुमार आयलानी, महेश सुखरामानी, जमनुदास पुरस्वानी यांची साथ आहे.
भाजपाचा ओमी टीमवर निशाणा?
ओमी कलानी हे समर्थकासह शिंदेसेनेच्या छावणीत गेले. भाजपच्या हेमा पिंजानी यांनी थेट माजी महापौर पंचम कलानी यांच्या बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रं-६ मधून कलानी विरोधात निवडणूक लडण्यास इच्छुक असल्याचे सांगून राजकीय वातावरण गरम केले. कलानी यावर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.