शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

भाजपाच्या पराभवाचे उपरे शिल्पकार

By admin | Updated: February 26, 2017 02:45 IST

ठाणे शहरासह हा जिल्हा एकेकाळी जनसंघाचा बालेकिल्ला होता. रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंपासून मुंबईतील राम नाईकांपर्यंत अनेकांवर या जिल्ह्याने

- नारायण जाधवठाणे शहरासह हा जिल्हा एकेकाळी जनसंघाचा बालेकिल्ला होता. रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंपासून मुंबईतील राम नाईकांपर्यंत अनेकांवर या जिल्ह्याने विश्वास दाखविला. या नेत्यांनीही आपली साधनसूचिता जपून ठाणेकरांचा विश्वास सार्थ ठरविला होता. परंतु,अलीकडे भाजपाच्या नेत्यांकडूनच त्यास तडे दिले जाऊ लागले. यामुळे पर्याय म्हणून त्यांनी १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेला आपलेसे केले. स्व. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना वाढविली. त्याला स्व. बाळासाहेब ठाकरेंनी पुरेपूर साथ दिली. यामुळेच राज्यात पक्ष स्थापनेनंतर ठाणे शहरातच शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली. त्या नंतर एखादा अपवाद वगळता गेल्या २५ वर्षांपासून ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे असे समीकरण कायम आहे.मात्र, यावेळी शिवसेनेची ही मक्तेदारी मोडण्याचा चंग भाजपाच्या श्रेष्ठींनी बांधला. त्यासाठी केंद्रापासून राज्यातील सत्तेचा पूर्णपणे वापर केला. मर्जीतील अधिकाऱ्यांना पाठवून येथील लोकप्रतिनिधींना तुरूगांत टाकण्याचे आदेश दिले. तशी कबुलीही दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा हवाला देऊन जाहीर सभेत दिली.ठाण्याचा ठाणेदार होण्यासाठी भाजपाने साम, दंड, भेद निती कशी अंगीकारली, याचे अनेक किस्से आता ऐकायला मिळत आहेत.परंतु, ठाणेदार होण्यासाठी जे शिलेदार निवडून आणावयाचे असतात त्याची जबाबदारी नागपूरकर फडणवीसांनी ज्यांनी ठाण्यात प्रतिकूल काळात भाजपाला जिवंत ठेवले, ज्यांनी शिवसेनेसह काँगे्रस-राष्ट्रवादीची दादागिरी गेली अनेक वर्षे सहन केली, त्यांच्या ऐवजी उपऱ्या नेत्यांवर सोपविली. ज्यांना ठाणे शहराचा इतिहास सोडाच परंतु, साधा भूगोलही माहित नाही, त्या श्वेता शालिनी, शिवाजी गावडे- पाटील यांच्या सारख्यांच्या संस्थेने कुणाला तिकीट द्यावे, याचा सर्व्हे केला. ज्या दिवशी या उपऱ्यांवर ठाण्याची जबाबदारी सोपविली, त्याच दिवशी ठाण्यातील भाजपाच्या पराभवाची बीजे रोवली गेली. त्यास भरीस भर म्हणून प्रचारात्मक आणि संघटनात्मक जबाबदारी खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सारख्या उपऱ्या नेत्यांवरच सोपविली. ठाणेकर नेते मात्र प्रचाराच्या मुख्य प्रवाहापासून चारहात लांब राहीले. ठाण्यात कोणत्या भागात कोणता वर्ग आहे, कोणता मतदार आहे, अमूक तमूक रस्ता कोठून सुरू होतो, अन कोठे संपतो याची खडानखडा माहिती असलेले नेते प्रचारात कोठेच दिसले नाहीत. त्यांना काही स्वार्थी मंडळीनी आपणच पक्षात ‘शालीन’ आहोत, तुम्ही नाहीत, असे सांगून खड्यासारखे बाहेर काढले. यानंतरही येऊरच्या कोठल्याशा बंगल्यावर तिकीट कोणाला द्यायचे येथपासून ते खोपट येथील पक्ष कार्यालयात पोलीस बंदोबस्तात एबी फार्मचे वाटप करूनही भाजपाच्या श्रेष्ठींना हे का घडले याचे शहाणपण सुचले नाही. संजय घाडीगांवकर नाट्याने भरवशाच्या ‘म्हशीला टोणगा’ कशाला म्हणतात हे दाखवून दिले. यामुळेच ५० हून अधिक ठिकाणी चांगली झुंज देऊनही भाजपाने निवडणुकीपूर्वी वर्तविलेला कमीतकमी ४० ते ४५ जागा किंवा स्वबळावर सत्तेचा दावा फोल ठरला. ठाण्यात अनुकूल वातावरण असूनही पक्षाची घोडदौड २३ जागांवर विसावली. त्यातही ९ ते १० जागा आयारामांच्या आहेत. म्हणजे भाजपाचे यश हे १२ ते १३ जागांचेच आहे. राज्यात भाजपाचा वारू चौफेर उधळला असतांना ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात पक्षाला एवढे अपयश का आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकांतून ठाणे शहरासाठी वेळ काढून तीन सभा घेतल्या. येथील लोकप्रतिनिधींचे खंडणीखोर, आणि दलाल असे वर्णन करूनही ठाणेकरांनी शिवसेनेला झुकते माप दिले.कारण ठाणे महापालिकेतील घोटाळे, शहराच्या दुरवस्थेविषयी केवळ ते आणि तेच बोलत होते. प्रचारसभा, रॅली सोडाच परंतु पत्रकार परिषदामध्येही निवडणुकीची जबाबदारी सोपलेले शिवाजी-गावडे पाटील, खासदार कपिल पाटील,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोठेच आवाज उठविला नाही. तिकडे राष्ट्रवादीने विविध पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी शिवसेनेवर विविध घोटाळ्यांचे आरोप करून प्रचार जिवंत ठेवला. मात्र, राष्ट्रवादीच्या आरोपांवर आधारीत मुद्दे मुख्यमंत्र्यांंच्या भाषणात मीठमसाला पुरविण्याचे काम श्वेता शालीनींसारख्या नेत्यांनी केले.पक्षाचे ठाण्यातील नेते आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले प्रचारात कुठेच दिसले नाहीत. यामुळे ठाण्याचा इतिहास, भूगोल माहित नसलेले हे उपरी नेते शिवसेनेने बकाल करून ठेवलेल्या रस्त्यातच अडकले. बाहेर पडण्याचा मार्गच माहित नसल्याने अन् मार्गदर्शनास स्थानिक गाईडही नसल्याने ठाण्यातील दिशा पूर्णत: भरकटली. मुख्यमंत्र्यानी ठाण्यातील बुथ कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या भाषणात रामायण, महाभारताचे दाखले दिले. मात्र, ठाण्यातील या राजकीय महाभारतीतील युद्धभूमीचे वर्णन करण्यासाठी घरात बसलेल्या ‘संजयने’ ही उपऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून मौन बाळगले. नोटबंदीनंतरही राज्यातील जनतेने दुसऱ्यांदा भाजपावर विश्वास दाखविला आहे. आधी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत आणि आता महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपाला अनेक ठिकाणी निर्विवाद बहुमत देऊन काँगे्रस अन राष्ट्रवादीवर असलेली नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचे दाखवून दिले आहे. राज्यातील दहापैकी आठ महापालिकांमध्ये भाजपाने आपली पकड आणखी मजबुत केली आहे. यात संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत स्वबळावर ८२ जागा मिळवून सत्ताधारी शिवसेनेसमोर आव्हान उभे केले आहे. ग्रामीण भागातही जिल्हा परिषदांमध्ये ४११ जागा जिंकून काँगे्रस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे. एकीकडे भाजपाचे वारू चौफेर उधळले असताना पक्षाने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या महापालिका पादाक्रांत केल्या. परंतु, दुसरीकडे याच महानगरांना लागून असलेल्या ठाणे महापालिकेत मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. याचे कारण भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी उपऱ्यांवर टाकलेला विश्वास. असे म्हणतात ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.’ तशीच गत भाजपाची ठाणे महापालिकेसह उल्हासनगरात झाली आहे. अशीच गत उल्हासनगरात झाली कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्या टीमला सोबत घेऊनही भाजपाला तेथे बहुमताची मॅजिक फिगर गाठता आली नाही. या टीमला भाजपाने ३२ तिकिटे दिली होती.त्यापैकी त्यांचे १५ सदस्य निवडून आले आहेत. शिवाय इतर आयारामही निवडून आले आहेत. येथील प्रचाराची धुरा शहर अध्यक्षांसह माजी आमदार कुमार आयलानींऐवजी उपऱ्या नेत्यांवर होती. त्यामुळे त्याचाही फटका भाजपला बसला. आता २० ते २१ जागांनी आपली ताकद वाढली असे भाजपा सांगत असली तरी वाढलेले सदस्य ओमी टीम आणि इतर पक्षातून आलेले आयाराम आहेत. येथे चांगल्या चारित्र्याचे उमेदवार दिले असते तर कदाचित भाजपाला आणखी चांगले यश मिळाले असते.या उलट शिवसेनेने भाजपासह काँगे्रस, राष्ट्रवादी अन मनसे व इतर, अशा चारही आघाड्यांवरून होणाऱ्या टीकेला तोंड देऊन शिवरायांच्या गनिमी काव्यास आदर्श मानून आपला प्रचार सुरू ठेवला. याचे श्रेय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायलाच हवे.त्यांनी केवळ परकीय शत्रूच नव्हे तर स्वपक्षीयांचाही या प्रचारयुद्धात चांगला बंदोबस्त केला. नातेवाईकांच्या तिकिटासाठी इतर पक्षात जाण्याची धमकी देणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे देऊन पक्षाचे काम करण्यास भाग पाडलेच शिवाय निकाल आल्यानंतर अशा बांडगुळांचा पराभव घडवून आणून त्यांची जागाही दाखवून दिली. यामुळे त्यांच्यासह पक्षाचीही डोकेदुखी पाच वर्षे का होईना दूर झाली आहे. तिकडे मात्र उपऱ्यांवर विसंबल्याने भाजपाचा ठाणे-उल्हासनगरातील कार्यभाग बुडाला आहे. तर एकजुटीने शिवसेना सर्वच आघाड्यांवर सरस ठरली आहे.