ठाणे : सहा वर्षीय पुतणीला क्लासमधून आणण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर, त्याच क्लासच्या शिक्षकाने अतिप्रसंग केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर, उपेंद्र माकवाना याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.ही पीडित महिला १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास विटाव्यातील एका खासगी क्लासमध्ये गेलेल्या पुतणीला घेण्यासाठी गेली होती. या क्लासमध्ये उपेंद्र आणि त्याची पत्नी हे दोघेही शिकवणी घेतात. त्या दिवशी पत्नी आजारी असल्यामुळे ती मुलुंडच्या रुग्णालयात उपचार घेत होती.पुतणीला घेण्यासाठी आलेल्या महिलेला उपेंद्रने मुलीचा होमवर्क बाकी असल्याचे कारण सांगून तिला बाहेर थांबविले. तोपर्यंत इतर मुले घरी गेली. ही मुले गेल्यानंतर, त्याने या महिलेला बाहेर थांबण्यापेक्षा घरात या, असे सुचवले. ती घरात आल्यानंतर तिला चहा करण्याच्या बहाण्याने किचनमध्ये येण्यास सांगितले.दरम्यान, दरवाजाची कडी लावून तिथेच तिच्याबरोबर त्याने अतिप्रसंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिच्या तोंडून शब्दही फुटला नाही. ‘झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नकोस, उद्या परत ये,’ असे सांगून, ‘तुला गर्भ पाडायचा असेल, तर परत माझ्याकडे ये, मी पाडून देतो,’ असे सांगून तिला धमकीही दिली. या प्रकरणानंतर प्रचंड भेदरलेल्या या महिलेने माकवाना याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
महिलेवर अतिप्रसंग; शिक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:40 IST