ठाणे : श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य असले तरीही याच महिन्यात कांदा कडाडला आहे. भाव वधारल्यामुळे त्याने सर्वसामान्यांनाही रडवले आहे. यंदा अवकाळी पाऊस तसेच गारपीटी यांसारख्या नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून भाव गगनाला भिडले आहेत. तर साठवणुकीमुळे कांद्याचे भाव वधारल्याचे आरोप किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून होत आहेत. मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांकडेच माल नसल्याने कांदे महागल्याचे लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी सांगितले.आशियातील कांद्यांची सगळ्यात मोठी मार्केट यार्ड लासलगावात आहे. लासलगाव यार्डावर ४५०० क्विंटलने माल विकला जात आहे. म्हणजेच किरकोळ व घाऊक बाजारात ५०-६० रुपये किलो रुपयाने कांदा मिळत आहे. मुळातच माल कमी असल्याने भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे असणारा कांदा हा पावसापाण्याने ओला झाल्याने सडला आहे. तर पावसाळी वातावरणात कांद्याचा साठा करणे शेतकरी व व्यापाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे साठेबाजीमुळे कांदा महागला, ही ओरड चुकीची आहे, असेही होळकर यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या महागाईला लगाम घालण्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आदी देशांतून कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी हा कांदा प्रत्यक्ष ग्राहकांच्या हाती येण्यास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत तो सडून जातो, असा आजवरचा अनुभव आहे.
ऐन श्रावणात कांदा वधारला...
By admin | Updated: August 18, 2015 23:15 IST