सदानंद नाईक, उल्हासनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी दिव्यांगांच्या समस्या व टीडीआर घोटाळ्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आत्मचिंतन आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तानी याबाबत दिव्यांगाची चर्चा करून बैठक बोलाविली आहे.
उल्हासनगरातील दिव्यांग बांधवाना दिले जाणारे मानधन वेळेवर मिळत नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांचे मानधन वेळेत मिळणे, दिव्यांगांचा पोटपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांना शहरात चार बाय चार आकाराची टपरी देणे, त्यांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे यापूर्वी केल्या होत्या. तसेच महापालिका नगररचानाकार विभागातील टीडीआर घोटाळ्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्याने, शासनाने चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश आयुक्ताना दिले. मात्र याबाबत आज पर्यंत काहीएक कारवाई झाली नसल्याचा आरोप स्वप्नील पाटील यांनी केला आहे. या सर्व प्रश्नांवर आवाज उठवत सोमवारी दिव्यांग प्रतिनिधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आत्मचिंतन आंदोलनास केले.
महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आत्मचिंतन आंदोलनाची दखल घेत दिव्यांग बांधवाशी चर्चा केली. पुढील ४८ तासांत सर्व दिव्यांगांचे मानधन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, तसेच मानधन वितरण प्रक्रियेत झालेल्या विलंबाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन आयुक्तानी दिले. असी माहिती पाटील यांनी दिली. तसेच दिव्यांगांसाठी मोफत बससेवा, स्टॉल वाटप व दिव्यांग साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारासंबंधी चर्चा करण्यासाठी बुधवार १६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विशेष बैठक आयुक्तानी आयोजित केली. या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र प्रहार जनशक्ती पक्षाला महापालिकेकडून देण्यात आले आहे. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.