ठाणे : केंद्र सरकारच्या फेमा-२ या योजनेअंतर्गत ९ मीटर आणि ६ मीटर लांबीच्या मिळून १०० इलेक्ट्रिक बस विकत घेण्याचा प्रस्ताव ठाणे परिवहन समितीच्या विचाराधीन होता. त्यासाठी परिवहन समितीकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, यासाठी केंद्र सरकारकडून जे अनुदान प्राप्त होते ते फक्त चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकांनाच दिले जात असून ठाणे शहराची लोकसंख्या ही २५ लाखांच्या आसपास असल्याने हा नियम अडचण ठरत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी परिवहन समिती सभापती विलास जोशी हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून यातून मार्ग काढण्याबाबत पत्र देणार आहेत.
टीएमटीची सेवा ही केवळ ठाणे महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित नसून मुंबई, भिवंडी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार या शहरांना देते. याचा विचार करून या महापालिकांची लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेला या इलेक्ट्रिक बससाठी अनुदान देण्यात यावे यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत.
परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस घेण्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती. त्याकरिता केंद्र सरकारच्या फेमा -२ अंतर्गत १०० बस घेण्याचा परिवहन प्रशासनाचा विचार सुरू होता. त्या आकाराने लहान म्हणजे ९ मीटर आणि ६ मीटर लांबीच्या असणार आहेत. अशा प्रकारच्या बस नवी मुंबई, नाशिक, पुणे परिवहन सेवांच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. तिथे त्या व्यवस्थित चालत आहेत.