मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील सरकारी जागेवरील बेकायदा बांधकामांना महसूल विभागाने नोटिसा बजावून दंडवसुली सुरू केली आहे. शहरात सुमारे २४ हजार अनधिकृत बांधकामे सरकारी जागेवर झाली असून आतापर्यंत सुमारे ७ हजारांपेक्षा अधिकांना नोटिसा बजावल्या आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन आहे. परंतु, त्या वेळचे महसूल विभागाचे अधिकारी, पालिका प्रशासन तसेच राजकारण्यांच्या आशीर्वादाने या जमिनींवर भू व चाळमाफियांनी अतिक्रमण करून पैसा कमावला. सरकारी जमिनींवर अतिक्रमण होत असताना वेळीच कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यातच अशा बांधकामांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कृपेने पाणी, वीजपुरवठा होतो. तसेच अन्य सुविधा मिळवून दिल्या जातात. शेतीच्या प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमणास दरदिवशी कमाल २५ रुपयांपर्यंत, तर अन्य बांधकामांना दरदिवशी कमाल ५० रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. आता महसुली उत्पन्न वाढवण्याचे सरकारचे आदेश असल्याने मीरा-भार्इंदरमधील पेणकरपाडा, महाजनवाडी, शिवनेरी, इंदिरानगर, घोडबंदर, काशिमीरा, उत्तन चौक येथील अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यास तलाठ्यांनी सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
अवैध बांधकामांना भार्इंदरमध्ये नोटिसा
By admin | Updated: January 26, 2017 03:11 IST