अंबरनाथ : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा भाविकांना प्रवेश नसल्यानं मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात किमान ४ ते ५ लाख भाविक भगवान महादेवाचं दर्शन घेत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोना वाढू लागल्यानं महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री १२ वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. यानंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आलं. हे शिवमंदिर तब्बल ९६१ वर्ष जुनं असून इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडलंय. त्यामुळे यंदा चुकल्या चुकल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया मंदिराचे पुजारी रवी पाटील यांनी दिली. तर भाविकांनी शिवमंदिर परिसरात येऊ नये, असं आवाहन अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केलं.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा शुकशुकाट; भाविकांच्या गर्दीविना शिवमंदिर परिसर पडला ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 09:26 IST