कल्याण : पूर्वेकडील हनुमाननगरमधील विंध्यवासिनी इमारतीत राहणाऱ्या वेलुवेलू ऊर्फ अलमेल (२) आणि गुरुमूर्ती (६ महिने) या अय्यर कुटुंबातील दोन लहान मुलांचा घरात गूढ मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आईवडिलांनीदेखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती असून, त्यांनीच मुलांची हत्या केल्याची चर्चा आहे. मात्र याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच लहानग्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विंध्यवासिनी इमारतीच्या तळ मजल्यावर व्यंकटेश अय्यर हे पत्नी भुवनेश्वरी व दोन लहान मुलांसह राहतात. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांची दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत्यू संशयास्पद असल्याने दोन्ही मुलांचे मृतदेह जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या मुलांचे वडील व्यंकटेश हे बेरोजगार असल्याची व अय्यर दाम्पत्याच्या हातांवर जखमा आढळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यावरच संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कल्याणमध्ये दोन बालकांचा गूढ मृत्यू
By admin | Updated: September 10, 2015 03:04 IST