माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत शिक्षक जातात भरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:12 PM2020-09-26T23:12:42+5:302020-09-26T23:12:57+5:30

अनेक ठिकाणी समस्यांचा सामना। विद्यार्थ्यांचे शिक्षणही बंद

My family, my responsibilities are overwhelmed by the teachers in the campaign | माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत शिक्षक जातात भरडले

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत शिक्षक जातात भरडले

Next

अजित मांडके ।

ठाणे : एक आठवड्यापासून ठाण्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी याअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणीमोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामाला पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपले आहे. परंतु, त्यांच्या जोडीला लोकप्रतिनिधींचे दोन स्वयंसेवक नाहीत, तर आरोग्य कर्मचारी म्हणून एकेक नर्स सोबत देण्यात आली आहे. काही ठिकाणी आशावर्कर आहेत, तर काही ठिकाणी नाहीत. अशा परिस्थितीत सर्व कामांची जबाबदारी ही पुन्हा एकदा शिक्षकांवर आली आहे. घरोघरी जाणाऱ्या शिक्षकांना मानापमानाचा नित्याचा सामना करावा लागत आहे. त्यातही ते जे काही काम करीत आहेत, त्याचे श्रेय मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाºयालाच जात असून उद्धटपणे वागत असून शिक्षकांना तुटपुंज्या साहित्यावर हे काम करावे लागत आहे.

शिक्षकांना जुंपल्यामुळे महापालिका शाळांमधील आॅनलाइन शिक्षण बंद झाले आहे. आधी सर्व्हे करा, मग विद्यार्थ्यांना शिकवा, असाच फतवा प्रशासनाने काढला आहे. नियमानुसार आरोग्य विभागातील कर्मचारी, लोकप्रतिनिधींचे दोन स्वयंसेवक आशावर्कर असणे आवश्यक आहे. आधी तीन सर्व्हे करण्यात आल्यानंतर आता पुन्हा काम आल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच केला जातोय मज्जाव
च्शिक्षकांना सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच मज्जाव केला जात आहे. काही ठिकाणी सोसायटीतील रहिवाशांची बोलणीदेखील खावी लागत असून तुमच्यामुळे आम्हाला कोरोना होईल, असे सांगून अनेक रहिवासी ही तपासणी करून घेत नाहीत. शिवाय, शिक्षकांबरोबर उद्धटपणे बोलत आहेत. तर, काही जाणकार नागरिक प्रवेश देत आहेत.

मोहिमेत शिक्षक आणि नर्सेस
च्आरोग्य विभागाच्या केवळ नर्सेस या कामात असून लोकप्रतिनिधींचा एकही स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे एक शिक्षक आणि एक नर्स अशा प्रकारे डोअर टू डोअर सर्व्हे सुरू आहे. मात्र, तपासणीपासून इतर माहिती गोळा करण्याचे काम हे शिक्षकांकडून होत असून मोबाइल अ‍ॅपमध्ये माहिती भरताना त्याचे श्रेय मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कामाची येथेही दखल घेतली जात नाही.

तुटपुंजे साहित्य
घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठी आरोग्य विभागाकडून शिक्षकांना मास्क, हॅण्डग्लोव्हज देण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी साध्या दर्जाचे पीपीई किटही देण्यात आले आहेत. मास्कदेखील साधेच देण्यात आले आहेत. त्यातही मास्क किंवा हॅण्डग्लोव्हज फाटले, तरी त्याची बोलणी शिक्षकांना खावी लागल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे आपल्या जीवावर उदार होऊन शिक्षक हे काम करीत आहेत.

१३५० शिक्षकांच्या खांद्यांवर जबाबदारी
या मोहिमेत ठाण्यातील खाजगी आणि महापालिकेचे सुमारे १३५० शिक्षक सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. पुढील १० आॅक्टोबरपर्यंत ते करावे लागणार आहे. तोपर्यंत शालेय शिक्षण बंद केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी केलेल्या सर्व्हेत शहरातील सुमारे ४५ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तीन जणांचा मृत्यूदेखील झालेला आहे. असे असताना जे काम शिक्षकांचे नाही, ते काम करावे लागत असल्याने शिक्षकांच्या मनात संताप आहे.

जनजागृतीचा अभाव
राज्य शासनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी आहे. परंतु, केवळ जीआरच काढण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती मोहीम आवश्यक होती, ती प्रशासनाकडून झालेली नाही. शिवाय, लोकप्रतिनिधींचे दोन स्वयंसेवक यात असणे गरजेचे आहे. परंतु, तेदेखील मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रभागातून जाऊन सर्व्हे करण्यात अडचणी येत आहेत.

या मोहिमेतून मोकळे करावे
शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांना आॅनलाइन शिक्षणासाठी या सेवेतून कार्यमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने तत्काळ त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आदेश असताना त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही.
- दिलीप डुंबरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, ठाणे शहराध्यक्ष

Web Title: My family, my responsibilities are overwhelmed by the teachers in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.