कल्याण : कल्याण पश्चिम युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा शिक्षण मंडळ सदस्य राकेश मुथा यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भिवंडी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. आपल्याला उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसच्या निरिक्षकांनी २० लाखांची मागणी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून पक्षात बंडखोरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना मानाचे स्थान दिले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुथा यांनी कल्याण पूर्वेकडील प्रभाग क्र. ३९ अशोक नगर येथून निवडणूक लढविली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला. ते प्रभाग क्रमांक ३० मल्हारनगर येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, तेथे दुसऱ्याला प्राधान्य मिळाल्याने पक्षाच्या निरिक्षकांनी त्यांना अशोक नगर प्रभागातून निवडणूक लढविण्यास सांगितले. उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडणूक लढविण्यापर्यंत वारंवार आपला मानसिक छळ झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका माजी नगरसेविकेनेदेखील मदत करण्यासाठी लाखो रूपयांची मागणी केली होती. ती मान्य न केल्याने विरोधात काम करून तीने आपला पराभव केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)उमेदवारीसाठी निरिक्षकांनी लाखो रूपये घेतल्याच्या मुथा यांच्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तसेच प्रभारी म्हणून माझ्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच असे आरोप कसे काय सुचले? - संजय चौपाने, जिल्हा प्रभारी
मुथा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
By admin | Updated: November 27, 2015 01:54 IST