ठाणे : आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता दुसरीकडे पावसाळ्याच्या आपत्तीचे कारण देऊन ठाणे महापालिकेने कामगार रुग्णालयातील शिल्लक राहिलेल्या सात इमारतींतील रहिवाशांनादेखील ४० तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अन्यथा वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.
परंतु, या इमारती अतिधोकादायक नसून धोकादायक असतानाही आणि यातील बहुतेक इमारतींची नुकतीच दुरुस्ती केली असतानाही त्याखाली करण्याच्या नोटिसा बजावल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या कामगार रुग्णालयात कामगारांसाठी यापूर्वी २७ इमारती येथे होत्या. परंतु, दरवर्षी धोकादायक इमारती घोषित करून आतापर्यंत २७ इमारती तोडल्या आहेत, तर ज्या इमारतींमध्ये या रहिवाशांना हलविण्यात आले होते, त्या इमारतींचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटदेखील झाले होते. या इमारती वास्तव्यास योग्य असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे येथे रहिवासी वास्तव्यास आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतींच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधीदेखील खर्ची घातला आहे. आता तर एक महिन्यापूर्वीदेखील येथील इमारतींची दुरुस्ती करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर केल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. असे असताना आता महापालिकेने पुन्हा या इमारती खाली करण्यासाठी मंगळवारी नोटीस बजावली आहे. येत्या ४० तासांत इमारती खाली करण्याचे अल्टिमेट देऊन वीज आणि पाणी कनेक्शन तोडले जाईल, असा इशाराही दिला आहे.