ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी गावदेवी मैदानाची परवानगी ठाणे महापालिकेने नाकारली आहे. हे मैदान शांतता क्षेत्रात येत असल्याने परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. ठाणे पालिका निवडणुकीत राज यांच्या ठाणे आणि दिवा या दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. यंदा दिवा हे मनसेचे लक्ष्य आहे. त्यामुळे तेथे जाहीर सभा घेण्याचे पक्षाने ठरवले आहे. ठाण्यात गावदेवी मैदानात जाहीर सभेसाठी पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. तशी परवानगी पालिकेकडे मािगतली होती. १५ व १६ फेब्रुवारीला हे मैदान देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. परंतु, हे मैदान शांतता क्षेत्रात येत असल्याने परवानगी नाकारल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली. पाच ते सहा दिवसांपूर्वी मनसेचे पदाधिकारी मैदानासाठी पावती बनवण्यासाठी आले, तेव्हा त्यांना परवानगी देऊ शकत नसल्याचे पालिकेने सांगितले. गावदेवी मैदानाची परवानगी पालिकेने नाकारल्यावर आम्ही कोर्टात जाणार होतो. परंतु, वेळ कमी असल्याने कोर्टात गेलो नाही. मुलांना खेळण्यासाठी, जाहीर सभांसाठी ठाण्यात मैदाने नाहीत. अस्तित्वात असलेली मैदाने सत्ताधाऱ्यांनी विकून टाकली आहेत, ही ठाण्याची शोकांकिका असल्याचे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज यांच्या सभेसाठी पालिकेने नाकारले मैदान
By admin | Updated: February 14, 2017 02:41 IST