कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांची बेशिस्त व मुजोरी हिचा बीमोड करण्याकरिता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशावरून एका दिवसात ३५ रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या. मात्र, गेल्या १५ दिवसांत आरटीओने २२ रिक्षा जप्त केल्या. कारवाईची तीव्रता कमी झाल्यानेच मुजोर रिक्षाचालकाने महिला होमगार्डवर जीवघेणा हल्ला करण्याचे धाडस दाखवले, असे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.डोंबिवलीतील गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकाकडून महिला होमगार्डला मारहाण झाल्याची घटना घडल्याने भरारी पथकाने रिक्षाचालकांविरोधातील कारवाई सुरू ठेवली असून ती अधिक तीव्र करू, अशी माहिती आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. ६ ते २० मार्चदरम्यान आरटीओने आणखी केवळ २२ रिक्षा जप्त केल्या. आरटीओने २८२ रिक्षांची तपासणी केली. त्यापैकी ४० रिक्षाचालक दोषी आढळून आले. ९० रिक्षाचालकांकडून दंड वसूल करून त्यांना समज देण्यात आली आहे. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यासमोर होमगार्ड सुनीता नंद मेहर यांना रिक्षाचालक रवी गुप्ताकडून मारहाण झाली. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याविषयीचा अहवाल वाहतूक नियंत्रण शाखेकडून आरटीओला प्राप्त होताच संबंधित रिक्षाचालकाविरोधात कारवाई केली जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कारवाई मंदावल्याने वाढली मुजोरी
By admin | Updated: March 21, 2017 01:58 IST