नामदेव पाषाणकर, घोडबंदरठाण्यातील गोठाचालकांनी अचानकपणे दुधाचे दर लीटरमागे चार रुपयांनी वाढवले असून आता म्हशीचे सुटे दूध ४६ ते ४८ रु पये, तर गायीचे दूध ३४ ते ३८ रुपये लीटरवर गेले आहे. त्यातही घोडबंदरसारखा परिसर असेल, तर हेच दर ६८ रुपये लीटरपर्यंतही जातात. या दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने केंद्र सरकारच्या विविध करांच्या ओझ्याखाली दबलेला ग्राहक या नव्या दरवाढीने भरडला गेला आहे. सुट्या दुधाच्या दरात जशी वाढ केली आहे, त्याचप्रमाणे पॅकबंद दुधाचे दरही अधिक आकारले जात असल्याची तक्रार आहे. ठाण्यात सर्वाधिक दूध पश्चिम आणि त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रातून येते. ठाण्यात शिवाईनगरमधील आरती डेअरीला नाशिक येथून दूधपुरवठा होतो. लोकमान्यनगरच्या कोल्हापूर महालक्ष्मी डेअरी आणि श्री गोकूळ डेअरीला कोल्हापूरमधून दूध येते. दोन्ही ठिकाणचे भाव वेगवेगळे आहेत. कुठूनही दूध आले, तरी प्रत्यक्ष विकल्या जाणाऱ्या दुधाबाबत संशय असल्यास त्याचे फॅट तपासण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. अनेकदा ते कमी आढळते. दुधात पाणी मिसळल्याच्या तक्रारी असतात. दुधाचे परीक्षण झाले, तरी कारवाई होताना दिसत नाही.
ठाण्यात दुधाचे दर चार रुपयांनी वाढले
By admin | Updated: June 3, 2016 01:52 IST