भार्इंदर : पूर्वेकडील रेल्वे समांतर केबीन रोडच्या रुंदीकरणासाठी महापौर गीता जैन यांनी थेट पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे जागेची मागणी केली. या जागेचे बाजारभावानुसार मूल्य दिल्यास किंवा पर्यायी जमीन उपलब्ध करुन दिल्यास रस्ता रुंदीकरणाकरिता जागा देण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखवली. तसेच महिला प्रवाशांच्या शिशुंसाठी नव्याने पाळणाघर सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी पाळणाघराची मागणी तत्वत: मान्य केल्याचे महापौरांनी सांगितले.महापौर व विभागीय व्यवस्थापकांसह पश्चिम रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती परिहार, उत्तर क्षेत्र विभागीय अभियंता देवेश शर्मा, नगरसेवक रोहिदास पाटील, शरद पाटील, मुन्ना सिंह, नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील, पालिका शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी भार्इंदर रेल्वे स्थानकाची संयुक्तपणे पाहणी केली.भार्इंदर पूर्वेकडील जागृती अपार्टमेंट ते रेल्वे फाटक दरम्यान असलेले रेल्वे समांतर केबीन रोड अरुंद असल्याने तेथील वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. पालिकेने गेल्या वर्षी या रस्त्याच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. तसे सीमांकनही पालिकेकडून करण्यात आले. परंतु, प्रशासनाने रुंदीकरणाची कारवाई गुंडाळून ठेवल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाकरिता रेल्वेची जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महापौरांनी रेल्वेकडे केली. प्रवाशांच्या सोयीकरिता रेल्वे सरकते जिने बांधणार असून एकूण चार जिन्यांपैकी एकच जिना बांधण्यात आला आहे. उर्वरीत तीन जिन्यांचे काम सुरु असले तरी पश्चिमेकडील बालाजी नगर येथून मोठ्याप्रमाणात प्रवाशांची ये-जा असल्याने तेथे सुद्धा सरकत्या जिन्यांचे बांधकाम करावे. शहरातील एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुतर्फा संरक्षक जाळी बसविण्यात यावी. शहरातील महिला रेल्वे प्रवास करीत असल्याने त्यांच्या शिशुंकरिता रेल्वे स्थानकातच पाळणाघराची सोय उपलब्ध करुन द्यावी. भार्इंदर पश्चिमेकडेही रेल्वे आरक्षणाचे केंद्र सुरु करावे, अशा मागण्या महापौरांनी विभागीय व्यवस्थापकांकडे केल्या. विभागीय व्यवस्थापकांनी केबीन रोडच्या विस्तारासाठी रेल्वेला बाजारभावाने जागेचे शुल्क अदा केल्यास अथवा त्या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा रेल्वेला दिल्यास रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्यास तत्वत: मान्यता दिली. (प्रतिनिधी)
रस्ता रुंदीकरणासाठी महापौरांचे साकडे
By admin | Updated: March 23, 2017 01:24 IST